Pune : पाषाण मधील उच्चभ्रू सोसायटीत चोरट्यांकडून घरात शिरून केअर टेकरवर कोयत्याने वार; 80 वर्षीय महिलेचे हात व तोंड बांधत घर लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पाषाण येथील सोसायटीत चोरट्यांनी घरात शिरून केअर टेकरवर कोयत्याने वार करत 80 वर्षीय महिलेचे हात व तोंड कापडाने बांधत घर लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. येथून सव्वाचार लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे.

याप्रकरणी 80 वर्षीय जेष्ठ महिलेने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या पाषाण येथील पंचवटी सोसायटीत राहतात. त्यांनी केअर टेकर नेमलेला आहे. बुधवारी (तीन मार्च) सायंकाळी साडेसात ते पावणेआठच्या सुमारास चारजण त्यांच्या घरात जबरदस्ती घुसले. यावेळी त्यांच्या हातात कोयता, सुरा अन काठी होती. चौघांना केअर टेकर दिसताच त्यानी प्रथम त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्यावर कोयत्याने वार केले व नंतर काठीने मारहाण केली. तो गंभीर जखमी झाल्याने खाली पडला.

त्यानंतर केअर टेकरसह जेष्ठ महिलेचे हात व तोंड कापडाने बांधले. त्यानंतर चोरट्यानी ऐवज शोधण्यासाठी घरातील सर्व सामान विस्कटून टाकले. पण हाती काहीच न लागल्याने चोरट्यांनी ‘माल कोठे आहे,’ अशी विचारणा केली. त्यानंतर ते पहिल्या मजल्यावरील बेडरूमध्ये शिरले. तसेच कपाटातील २५ हजार रोख व सोन्याचे दागिने असा एकूण सव्वाचार लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. अधिक तपास चतु:श्रृंगी पोलीस करत आहेत.