पुण्यातील कोंढाव्यात व्याजाच्या पैशावरून झालेल्या झटापटीत तरुण 11 व्या मजल्यावरून ‘कोसळला’, खुनाचा संशय, तिघे ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात व्याजाच्या पैशाच्या वादात झालेल्या झटापटीत बहुमजली इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून एकजण खाली कोसळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला आहे. दरम्यान, खुनाचा संशय व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. कोंढवा परिसरात ही घटना घडली आहे.

सागर चिलवेरी (वय 24, रा. सोलापूर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा भागात खडीमशिन चौकात पूल हौसिंग ही 11 मजल्याची सोसायटी आहे. चिलवेरी हे 11 मजल्यावर राहत होते. दरम्यान त्यांनी आरोपीकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्यावरून त्याच्यात वादावादी सुरू होती.

आरोपी पैसे मागण्यांसाठी चिलवेरी यांच्याकडे गेले होते. त्यावेळी त्यांच्यात पैशावरून वाद झाला. यातून 3 आरोपींची व त्यांच्यात झटपट झाली. यात चिलवेरी 11 व्या मजल्यावरून खाली कोसळले. यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, खुनाचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी घटनास्थळीला भेट देऊन आरोपींकडे चौकशी सुरू केली आहे.