Pune : कोंढव्यात उधार माल न दिल्याने दुकानदारावर 5 जणांनी केले कोयत्याने वार, परिसरात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – किराणा माल उधार न दिल्याने पाच जणांच्या टोळक्याने दुकानादारावर कोयत्याने वार करत लुटल्याची घटना घडली. त्यांच्याकडील साडे आठ हजार रुपये काढून घेत पोबारा केला. मंगळवारी सायंकाळी कोंढव्यात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी आशिकेत मारूती कचरे (वय २३, रा. गोकुळनगर, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशिष ढाकले (रा. गोकुळनगर, कोंढवा), सुरेश दयाळु (रा. अप्पर डेपो, बिबवेवाडी) आणि इतर अशा पाच जणांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कोंढवा बुद्रुक परिसरात किराणा दुकान आहे. आरोपी हे दुकानात किराणा आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी उधार माल मागितला. पण त्यांनी दिला नाही. याचा राग आरोपींना होता. मंगळवारी सायंकाळी कान्हा हॉटेल चौक येथून जात असताना आरोपींनी फिर्यादी त्यांना अडविले. किराणा माल उधार का दिला नाही, म्हणून त्यांना हाताने व कोयत्याने जबर मारहाण केली. त्यांच्या खिशातील साडेआठ हजार रुपये जबरद्स्तीने काढून घेतले. यात फिर्यादी हे जखमी झाले आहेत. त्यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास कोंढवा पोलिस करत आहेत.

You might also like