पुणे : Pune Crime News | ऊस तोडणीसाठी येणार असल्याचे सांगून १ लाख ७० हजार रुपयांची उचल घेऊनही ऊस तोडणीला आला नाही. या कारणावरुन एका मजुराला काही जणांनी मारहाण करत अपहरण केले होते. चंदननगर पोलिसांनी बीडमध्ये जाऊन या मजुराची सुटका करुन तिघा जणांना अटक केली आहे. (Arrest In Kidnapping Case)
गौतम केरुजी पोटभरे (वय ३७, रा. राजेवाडीता, माजलगाव, जि. बीड), अभिजित वसंत पोटभरे (वय २७, रा. राजेवाडीता, माजलगाव, जि. बीड), शुभम वासुदेव मायकर (वय २५, रा. मुकेंडे पिंपरी, राजेवाडी, ता़ वडवणे, जि़ बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Chandan Nagar Police)
याबाबत शकुंतला कैलास सोनवणे (वय २५, रा. आंबेडकर वसाहत, चंदननगर) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. कैलास गुलाब सोनवणे (वय ३०) यांचे अपहरण करण्यात आले होते. सोनवणे हे मुळचे जालना जिल्ह्यातील भाचेगाववडी येथील राहणारे आहेत. ते गेल्या चार महिन्यांपासून पुण्यात आले आहेत. कैलास सोनवणे हे वडगाव शेरी येथील शाहरुख तांबोळी यांच्या टेम्पोवर चालक म्हणून काम करतात. ते ३० जून रोजी कामावर गेले. दुपारी चार वाजता त्यांचा शेजारील महिलेच्या मोबाईलवर फोन आला. त्याने सांगितले की मला गाडीतून टाकून आणले आहे. तू २ लाख रुपये जमा करुन ठेव. तुझ्याकडे दोन लोक येतील त्यांना पैसे दे, नाही तर हे लोक मला सोडणार नाही, असे सांगून फोन कट केला. त्यांच्या पत्नीने चंदननगर पोलिसांकडे तक्रार दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर यांच्याकडे याचा तपास दिला. आरोपींबाबत तांत्रिक विश्लेषण करुन आरोपी व पिडित हे बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर पोलीस उपनिरीक्षक अजय असवले, पोलीस अंमलदार शिंदे, लहाने असे पथक तयार करुन ते २ जुलै रोजी सकाळी माजलगावला पोहचले. धारुर तालुक्यातील भोगलवाडी येथील टॅक्टरमालक वशिष्ठ ऊर्फ मुन्ना मुंडे याच्या शेतामध्ये आरोपी असल्याचे समजल्यावर पोलिसांनी तेथे जाऊन कैलास सोनवणे याची सुटका करुन तिघांना अटक केली.
त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, कैलास सोनवणे याने ऊसतोडणीसाठी येतो असे सांगून १ लाख ७० हजार रुपयांची उचल घेतली होती. उचल घेतल्यानंतरही तो ऊसतोडणीसाठी गेला नाही. तसेच गावातून पुण्याला निघून आला. त्याच्याकडे पैसे परत मागितले तर ते देण्यास टाळाटाळ करत होता. तसेच त्याचा पत्ताही तो सांगत नव्हता. शेवटी त्यांनी कैलास सोनवणे याचा शोध घेऊन त्याला वडगाव शेरी येथे पकडून ते बीडला घेऊन गेले होते. सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर तपास करीत आहेत.