पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | US POLO कंपनीचे नाव व लोगो वापरुन कॉपीराईट कायद्याच्या भंग करुन बनावट शर्टची विक्री करताना पोलिसांनी दोन दुकानांवर कारवाई करुन तेथून ४ लाख ८ हजार ५०० रुपयांचे ८१७ शर्ट जप्त केले आहेत.
याबाबत मंगेश जगन्नाथ देशमुख (वय ४५, रा. वारजे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अविशा मौला सय्यद (रा. उरुळी कांचन) आणि स्वरुपसिंग अशोकसिंग राजपुरोहित (रा. कदमवाक वस्ती, हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना माहितीगाराकडून माहिती मिळाली की, लोणी स्टेशन येथील ए टु झेड कलेक्शन आणि कदमवाक वस्ती येथील रॉयल फिल लाईफ स्टाईल यादुकानांमध्ये यु एस पी ए या कंपनीचे कॉपीराईट केलेले बनावट कपडे विक्री होत आहे. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी ए टु झेड कलेक्शन या दुकानावर छापा घातला. तेथे पहाणी केल्यावर यु एस पी ए कंपनीचे कॉपीराईट केलेले कपडे डिस्काऊंट रेट मध्ये शर्ट ५०० रुपयांना विक्री करीत असल्याचे दिसून आले. या दुकानात १ लाख ८४ हजार ५०० रुपयांचे ३६९ शर्ट व टी शर्ट मिळून आले. त्यानंतर रॉयल फिल लाईफस्टाईल या दुकानावर छापा टाकला. तेथे २ लाख २४ हजार रुपयांचे ४४८ शर्ट मिळून आले. दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव तपास करीत आहेत.