पुणे : Pune Crime News | कॅम्पमधील एका दुकानदाराला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडून गुंड हप्ता वसुल करत असे. पोलिसांनी या गुंडाला अटक केली आहे. (Lashkar Police)
अरबाज मैनुद्दिन कुरेशी (वय २८, रा. भिमपुरा कॅम्प) असे या गुंडाचे नाव आहे. अरबाज कुरेशी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
याबाबत ओमप्रकाश बोमाराम चौधरी (वय ३५, रा. महादेव ट्रेडर्स, सेंटर स्ट्रीट, कॅम्प) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर भागातील सेंटर स्ट्रीट परिसरात चौधरी यांचे दुकान आहे. आरोपी कुरेशीने त्यांना दरमहा हप्ता देण्याची मागणी करुन धमकाविले होते. या भागात व्यवसाय करायचा असेल तर दरमहा हप्ता द्यावा लागेल़ दुकान चालवायचे असेल, पैसा देना पडेगा, नही तो तुमको, मार डालुंगा, अशी धमकी तो चौधरी यांना देत होता. त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी त्यांच्याकडून १५ हजार ८०० रुपये जबरदस्तीने घेऊन गेला होता. त्याच्या त्रासाला कंटाळून शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली. पोलिसांनी अरबाज कुरेशी याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक तरटे तपास करत आहेत.