सराईताची पोलिसावर दगडफेक, येरवड्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मद्यपान करुन पत्ते खेळणार्‍या सराईताला मज्जाव केल्यानंतर त्याने बीट मार्शलवरील पोलीसांवर दगडफेक केल्याची घटना येरवडा परिसरात घडली. रविवारी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी किरण नंदकुमार साळवे (वय 32, रा. महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक विशाल गव्हाणे यांनी तक्रार दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळवे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर 6 गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपुर्वी तो कारागृहातून सुटला आहे. रविवारी संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास चिमागार्डन मागे काहीजण पत्ते खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार बीट मार्शल गव्हाणे घटनास्थळी गेले. तीन ते चारजण पत्ते खेळत होते. तर, साळवे याने मद्यपान केलेले निदर्शनास आले. गव्हाणे यांनी त्यांना पत्ते न खेळण्यासाठी समज दिली. याचा राग आल्याने गव्हाणे यांच्यावर दगडफेक करत गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शांतामल कोलुरे अधिक तपास करीत आहे.

भीमथडी जत्रेतून व्यवसायिकाची साडेतीन लाखांची रोकड चोरीला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील बस स्थानके आणि गर्दीचे ठिकाणी पुणेकर सुरक्षित तर, नाहीतच पण, आता चोरटे जत्रा आणि लग्न कार्यातही शिरून आपली कामगिरी चोख पार पाडत आहेत. भीमथडी जत्रेत चोरट्यांनी एका राजस्थानातील व्यवसायिकाची साडेतीन लाखांची रोकड असणारी पिशवी चोरून नेली आहे.

याप्रकरणी ओमप्रकाश दोसाया (वय 39, रा. जयपूर, राजस्थान ) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथील सिंचन मैदानावर दरवर्षीप्रमाणे भिमथडी जत्रा आयोजित करण्यात आली आहे. राज्यासह परदेशातील नागरिकही याठिकाणी येतात. दरम्यान, फिर्यादी ओमप्रकाश मूळचे राजस्थानचे असून भीमथडी जत्रेत त्यांनी कपड्यांच्या विक्रीचा स्टॉल लावला होता. दोन दिवसांपुर्वी रात्री साते ते साडेसात वाजण्याच्या सुमारास गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी ओमप्रकाश यांच्या कापड विक्री स्टॉलवरील ड्रॉव्हरमधून 3 लाख 50 हजारांसह, पॅनकार्ड, पासपोर्ट कागदपत्र असलेली पिशवी चोरुन नेली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुबराव लाड अधिक तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/