मद्यपीकडून पोलिसाला धक्काबुक्की

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मद्यपान करून भरदुपारी रस्त्यात गोंधळ घालणार्‍यास समजावणार्‍या पोलीसालाच मद्यपीने धक्काबुक्की करत जखमी केल्याची घटना येरवडा परिसरात घडली. त्याला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

सुरेश केशव गालफाडे (वय 40, रा. सैनिकवाडी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक राजीव हिले यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील सैनिकवाडी परिसरात एकजण गोंधळ घालत असल्याची माहिती नियंत्रण कक्षातून येरवडा पोलिसांना मिळाली. त्यानुसार दुपारी बाराच्या सुमारास राजीव आणि त्यांचे सहकारी बडे घटनास्थळी पोहचले. त्याठिकाणी मद्यपान केलेल्या सुरेशला राजीव हिले समजावून सांगत होते. त्याचा राग आल्याने सुरेशने राजीव हिले यांना ‘तू खरच पोलिस आहेस का’, असे म्हणून राजीव यांच्यासह बडेंना शिवीगाळ केली. त्यानंतर राजीव हिले यांना धक्काबुक्की करीत खाली पाडून जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दीनेश गुर्जर अधिक तपास करीत आहेत.

बिबवेवाडीत मंदीरातील दानपेटी फोडली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बिबवेवाडीतील आई-माता मंदीरातील दानपेट्या फोडून चोरट्यांनी रोकड चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरटे घर, दुकानांसोबतच मंदिरांवरही लक्ष करू लागले आहेत.

याप्रकरणी लच्छाराम चौधरी (वय 62, रा. बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडीततील गंगाधाम रस्त्यावर आई-माता देवीचे मंदीर आहे. त्या मंदीराचे कोषाध्यक्ष म्हणून चौधरी काम पाहतात. दोन दिवसांपुर्वी रात्री दहा वाजेनंतर मंदीर परिसरात कोणीही नसल्याचे पाहून चोरट्यांनी मंदीरातील दोन दानपेट्या उचकटून 15 हजारांची रोकड चोरुन पळ काढला. याप्रकरणी पोलीस हवादलार बी. ए. शेवाळे अधिक तपास करीत आहेत.


घनकचरा उचलणार्‍या कामगारास मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सार्वजनिक रस्त्यावरील कचरा न उचल्याच्या रागातून कचरावेचक कामगारास बांबूने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.  आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.

प्रकाश रमेश सावंत (वय 52, रा. शुक्रवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी तानाजी देवकुळे (वय 42, रा. लोहियानगर) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी महानगरपालिकेत घनकचरा विभागात कार्यरत आहेत. दोन दिवसांपुर्वी सकाळी सहाच्या सुमारास ते शुक्रवार पेठेतील समृद्धी अपार्टमेंटसमोरील रस्त्यावर कचरा गोळा करीत होते. कचरा व्यवस्थित गोळा न केल्याच्या रागातून प्रकाशने तानाजी यांना बांबूने मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस अधिक तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/