पार्टीतील गाण्यावरून ‘बाऊन्सर’ अन् तरूणांमध्ये तुफान ‘राडा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पाषाण परिसरातील ठिकाणा हॉटेलात पार्टीसाठी गेलेल्या तरुण आणि हॉटेलच्या बाऊन्सरमध्ये मध्यरात्री तुंबळ हाणामारीचा प्रकार घडला आहे. गाण्यावरून हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणी प्रतीक कदम (वय 20, गोखलेनगर) यांनी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 14 ते 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर, गणेश साळुंखे (वय 28) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 7 ते 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाण परिसरात हॉटेल ठिकाणा आहे. येथे प्रतीक व त्याचे काही मित्र रात्री पार्टी करण्यासाठी गेले होते. हॉटेलात गर्दी असल्याने येथे बाऊन्सर नेमण्यात आलेले आहेत.
दरम्यान, पार्टी सुरू असताना गाणी बंद करण्यात आली होती. त्यामुळे फिर्यादींनी गाणे लावण्याची विनंती केली. यावरून त्यांच्यात वाद झाला. वादाचे रुपांतर कडाक्याच्या भांडणात झाले आणि त्यातून तुंबळ हाणामारीची घटना घडली. हा सर्व प्रकार मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास झाला आहे.

दोघांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
प्रतीकच्या फिर्यादीनुसार, हा वाद झाल्यानंतर तो आणि त्याचे मित्र हॉटेलमधून बाहेर पडले. त्यावेळी त्यांना बाऊन्सरनी लाकडी दांडक्याने तसेच स्टीलच्या रॉडने बेदम मारहाण केली.

तर, गणेश यांच्या फिर्यादीनुसार, हॉटेल बंद करताना पार्टीसाठी आलेल्यापैेकी एकाने दारू मागितली. परंतु, त्यांनी दारू दिली नाही. याचा राग आल्याने तरुणांनी बाऊन्सर व हॉटेलच्या चालकाला मारहाण केली. तसेच, हॉटेलवर दगडफेक केली. अधिक तपास चतुश्रृंगी पोलीस करत आहेत.