पुण्यात Paytm अपडेट करण्याच्या बहाण्याने भामटयांकडून नागरिकांची फसवणूक सुरूच

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – सायबर चोरट्यांने पेटीएम अ‍ॅप अपडेट करण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्याचे सत्र कायम असून ज्येष्ठ नागरिकाची बँक खात्याची माहिती घेऊन दीड लाखांची रोकड लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयकुमार नातू (वय ६९,रा. संगम प्रेसजवळ, कोथरूड) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नातू यांना अनोळखी क्रमांकावरून एकाने संपर्क साधला. पेटीएम अ‍ॅप अपडेट न केल्यास बंद पडेल, अशी बतावणी केली. त्यानंतर चोरट्याने नातू यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन त्यांच्या खात्यातून १ लाख ४८ हजार ९५२ रुपये लांबविले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक कल्पना जाधव करत आहेत.

बक्षीसाच्या आमिषाने महिलेची फसवणूक

बक्षीसाच्या आमिषाने महिलेला सायबर चोरट्याने गंडा घातला. याप्रकरणी महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दहा दिवसांपूर्वी अज्ञाताने महिलेला संपर्क साधला. तसेच महिला वापरत असलेल्या अ‍ॅपमध्ये लवकरच बक्षिसाची रक्कम जमा करण्यात येणार आहे, असे आमिष तिला दाखविले. त्यानंतर चोरट्याने त्यांना एका अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले. महिलेने अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर चोरट्याने महिलेच्या बँक खात्यातून १ लाख २२ हजार ९९९ रुपये लांबविले. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर करत आहेत.