Pune : धायरी परिसरात घरफोडी, सव्वा लाखाचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहरातील घरफोड्यांचे सत्र काही केल्या थांबत नसून वेगवेगळ्या भागात तीन ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत. यात चोरट्यांनी सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

याप्रकरणी मनिषा सचिन शिंदे (वय २४) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी या धायरी परिसरात राहण्यास आहेत. १२ सप्टेंबर रोजी त्या कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेल्या होत्या. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी कुलूप उचकटून आत प्रवेश केला. त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने, मोबाईल असा एकूण ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. त्या दोन दिवसांनी घरी आल्यानंतर घरफोडीचा प्रकार समोर आला आहे. अधिक तपास सिंहगड रोड पोलिस करत आहेत.

तर दुसरी घटना बिबवेवाडीतील तुळशीनगर परिसरात घडली आहे. येथे राहणारे शशांक शशिकांत तांबवेकर (वय ५०) यांच्या बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी 7 हजाराचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले आहे. शशांक हे १३ सप्टेंबर रोजी कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले होते. त्यानंतर हा घरफोडीचा प्रकार घडला. पुढील तपास बिबवेवाडी पोलिस करत आहेत.

तसेच पुणे आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी येथील गौरव मेडीकलमध्ये घरफोडी झाली आहे. याबाबत निवृत्ती दिनकर तांबे (वय ५४) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. १३ सप्टेंबर रोजी तांबे हे नेहमी प्रमाणे मेडिकलचे दुकान बंद करून गेले होते. त्यानंतर चोरट्यांनी त्याच्या दुकानाचे शटर उटकटून काउंटरमध्ये ठेवलेले २२ हजार ५०० रुपये चोरून नेले. दुसऱ्या दिवशी हा प्रकार समोर आला. त्यानंतर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.