आईला भेटण्यासाठी त्यानं चक्क दुचाकी चोरली अन् पुढं झालं ‘असं’ काही, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुण्यात वाहन चोरीच्या घटना वाढत असताना पुणे पोलिसांनी एकाला पकडल्यानंतर त्याने चक्क आईला भेटायला जाण्यासाठी दुचाकी चोरल्याचे समोर आले आहे. परंतु यानंतर त्याला दुचाकी चोरने सोपं वाटल्याने पुन्हा चोरी केली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट चारने हा प्रकार समोर आणला आहे.

सिद्धार्थ संतोष परदेशी (वय 29, मंगळवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

शहरात वाहन चोरीच्या घटना वाढत आहेत. त्यापार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पथकांना वाहन चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना लक्ष ठेवून जेरबंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार परिसरात माहिती काढून गुन्हे शाखेचे पोलीस तपास करत आहेत. यादरम्यान युनिट चारमधील अब्दुल सय्यद आणि सुरेंद्र साबळे यांना गोपनीय बतमीदारामार्फत आरोपी परदेशी याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अंजुम बागवान, उपनिरीक्षक विजय झंझाड, कर्मचारी भालचंद्र बोरकर, शंकर पाटील यांच्या पथकाने त्याला पकडले. त्यावेळी त्याच्याकडे दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, अहमदनगर येथे आईला भेटण्यासाठी जायचे होते. पण वाहन नव्हते. त्यात लॉकडाऊन होते. त्यामुळे त्याने लष्कर भागातून मोपेड दुचाकी चोरली. त्यानंतर तो आईला भेटून आला. यावेळी त्याला मोपेड दुचाकी चोरने सोपे वाटल्याने त्याने पुन्हा एक मोपेड याच परिसरातून दुचाकी चोरली.

दरम्यान चोरलेल्या दुचाकी तो विक्रीसाठी ग्राहक शोधत असताना त्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला पकडण्यात आले. यापूर्वी देखील त्याच्यावर आर्म ऍक्टचा एक गुन्हा दाखल आहे.