‘घरवाली’ पोहचली ‘बाहेरवाली’च्या फ्लॅटवर, झाला ‘पर्दाफाश’ अन् ‘बोंबाबोंब’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पती फ्लॅट भाड्याने घेऊन एका महिलेसोबत राहत असल्याचे समजल्यानंतर पत्नी तिच्या बहिणीसोबत तेथे पोहचली खरी पण, पतीला राग अनावर झाल्याने दुसरीने आणि पतीने दोघींना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी 45 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती किशोर निकम व पतीसोबत असणारी अनोळखी महिला यांच्यावर भादवी कलम 324, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पती एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. मात्र, सध्या तेथील काम सोडले आहे. तो सध्या काहीच काम करत नाही. फिर्यादी या गृहीणी आहेत. दरम्यान, काही दिवसांपुर्वी फिर्यादींना पती दुसर्‍या एका महिलेसोबत भाड्याने फ्लॅट घेऊन आंबेगाव बुद्रुक परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे दोन दिवसांपुर्वी फिर्यादी व त्यांची बहिण खात्री करण्यासाठी याठिकाणी आल्या.

त्यावेळी पती दुसर्‍या महिलेसोबत या फ्लॅटवर राहत असल्याचे आढळून आले. यामुळे इमारतीत चांगलाच गोंधळ उडाला. त्यावेळी राग आल्याने पतीने आणि त्याच्यासोबत असणार्‍या महिलेने फिर्यादी यांना शिवीगाळकरून लाथा बुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर पतीने फिर्यादींच्या डोक्यात हेल्मेट घालून त्यांना लोखंडी वस्तूने मारहाण केली. यात फिर्यादी या जखमी झाल्या आहेत. त्यांनी उपचार घेऊन पोलीसांकडे धाव घेतली. त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप याप्रकरणात कोणाला अटक करण्यात आलेली नाही. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –