पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | भीम जयंतीचा कार्यक्रम पाहून पहाटे गप्पा मारत थांबले असताना गुन्हेगाराने तरुणाच्या खिशात हात घालून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने ढकलून दिल्याच्या रागातून गुन्हेगाराने तरुणाच्या गळ्यावर वार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत सुशील अजिनाथ थोरात (वय २६, रा. भगवा चौक, कासेवाडी, भवानी पेठ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पोलिसांनी भरत ऊर्फ हरिष मोरे (रा. कासेवाडी, भवानी पेठ) याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कासेवाडी येथील गोल्डन ज्युबिली चौकात सोमवारी पहाटे ६ वाजता घडली. (Attempt To Murder)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील थोरात, त्याचे मित्र अनिकेत यादव, अभिजित जाधव हे विश्रांतवाडी येथील भिमजयंती कार्यक्रम पाहून पहाटे आले होते. गोल्डन ज्युबिली चौकात ते गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी त्यांच्या तोंड ओळखीचा भरत मोरे हा तेथे आला. त्याने सुशील याच्या खिशात हात घातला. तेव्हा सुशील याने त्याला ढकलून दिल्याने जमिनीवर पडला. त्याने उठून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
मला खाली कसा काय पाडलास, आता तुला मारुनच टाकतो, असे म्हणून त्याने त्याच्याकडील धारदार हत्यार काढून सुशील याला मारहाण करण्यास सुरुवात केली. सुशील याच्या गळ्यावर जोराने वार केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. भरत याने सुशील याच्या कानावर, हातावरही वार केले. त्याचे मित्र व जाणारे येणारे लोक त्याच्या मदतीला आले. तेव्हा भरत मोरे याने लोकांना हातातील हत्यार हवेत फिरवून याला कोणी वाचवायला आले तर सर्वांचे तुकडे करुन टाकेन, आपन भाई आहे, असे म्हणत लोकांना धमकावले. त्यामुळे लोक पळून गेले. त्यानंतर सुशील याच्या दोन मित्रांनी धाडस करुन त्याला धरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो पळून गेला. त्यानंतर सुशील याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. खडक पोलिसांनी ससून रुग्णालयात जाऊन सुशील याची फिर्याद घेतली असून पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे तपास करीत आहेत.