पुणे : Pune Crime News | पैशांसाठी आपल्या ४० दिवसांच्या मुलीला आईवडिलांनीच साडेतीन लाखांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerawada Police) या बालिकेला विकत घेणारी महिला, बालिकेच्या आईवडिलांसह मध्यस्थ अशा ६ जणांना अटक केली आहे.
मिनल ओंकार सपकाळ (वय ३०, रा. बिबवेवाडी) ओकांर औदुंबर सपकाळ (वय २९, रा. बिबवेवाडी), साहिल अफजल बागवान (वय २७, रा. सातारा), रेश्मा शंकर पानसरे (वय ३४, रा. येरवडा), सचिन रामा अवताडे (वय ४४, रा. येरवडा), दीपाली विकास फटांगरे (वय ३२, रा. संगमनेर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलीस फिर्यादी झाले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनल सपकाळ यांना पहिल्या पतीपासून एक पाच वर्षाचा मुलगा आहे. त्या सध्या ओंकार सपकाळ बरोबर रहात असून त्यांना २५ जून २०२५ रोजी एक मुलगी झाली. या मुलीच्या बदल्यात तुम्हाला साडेतीन लाख रुपये देतो, अशी लालुच इतर मध्यस्थांनी दिली. त्यांनी ही ४० दिवसांची मुलगी दीपाली फटांगरे हिला दिली. त्याबदल्यात मध्यस्थांमार्फत २ लाख रुपये या मुलीच्या आईवडिलांना दिले होते. या मध्यस्थांना अधिक रक्कम मिळाली आणि आपल्याला त्यांनी कमी पैसे दिले, असा संशय सपकाळ यांना आला. त्यांनी त्यांच्याकडे आणखी पैसे मागितले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. तेव्हा सपकाळ येरवडा पोलिसांकडे गेले.
आमची मुलगी पळवून नेली असे सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी मध्यस्थ व मुलीला विकत घेणार्या दिपाली फटांगरे यांना पकडून आणले. त्यांची पोलिसांनी वेगळ्या पद्धतीने चौकशी केली. तेव्हा उलटाच प्रकार समोर आला. या बालिकेला पळवून नेली नसून तिच्या आईवडिलांनीच तिला विकल्याचे वास्तव समोर आले. फटांगरे हिला कोणतेही कायदेशीर दत्तक विधान प्रक्रिया पार न पाडता साडेतीन लाख रुपयांच्या मोबदल्यात सपकाळ त्यांची बालिका विकून संगनमत व सहाय्य करुन मानवी अपव्यापाराचा अपराध केला असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी सांगितले की, अगोदर मुलीचे आईवडिल मुलीला पळवून नेले अशी तक्रार घेऊन आले होते. चौकशीमध्ये त्यांनीच मुलीला बेकादेशीरपणे विकल्याचे समोर आल्यावर पोलीस फिर्यादी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.