पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | पहाटे घरी जात असलेल्या तरुणीचा पाठलाग करुन पिस्तुलाचा धाक दाखवून तिला मिठी मारुन विनयभंग करण्याचा प्रकार सहकारनगरमध्ये घडला होता. या गुन्ह्याचा तपास करत सहकारनगर पोलीस मध्य प्रदेशातील उज्जैनला पोहचले. तेथे लॉजवर मुक्काम केलेल्या आरोपीची वेशांतर करुन माहिती काढली. त्यानंतर तो जाळ्यात येताच त्याला जेरबंद केले. (Arrested In Molestation Case)
दीपक शिवाजी ठाकर (वय ४५, रा. चव्हाणनगर, धनकवडी) असे या नराधमाचे नाव आहे. त्याला सहकारनगर पोलिसांनी उज्जैनमधील खाराकुंवा पोलीस ठाण्यात अटक केली. उज्जैन येथील न्यायालयात हजर करुन त्याचा ट्रांझिस्ट रिमांड घेण्यात आला. त्यानंतर पुण्यात आणून त्याला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ मार्च रोजी पहाटे सव्वा चार वाजता एक २४ वर्षाची तरुणी घरी येत होती. दीपक ठाकर याने तिचा पाठलाग केला. ती गाडी पार्क करत असताना त्याने तिला मिठी मारुन अश्लिल वर्तन करुन तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. दोघेही एकाच परिसरात रहात असून एकमेकांच्या परिचयाचे आहेत. दीपक ठकार याच्या या कृत्याने घाबरलेल्या या तरुणीने तातडीने पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली होती.
सहकारनगर पोलीस ठाण्याचे पथक दीपक ठकार याचा शोध घेत होते. या प्रकारानंतर तो पुण्यातून पळून गेला होता. दुसर्या दिवशी या गुन्ह्यात अनुसूचित जाती -जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारणा अधिनियमाचे कलम वाढविण्यात येऊन त्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्याकडे देण्यात आला. पोलीस अंमलदार अमोल पवार व महेश मंडलिक यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दीपक ठाकर हा उज्जैन येथे आहे. या खात्रीशीर बातमीनुसार सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, पोलीस अंमलदार अमोल पवार, चंद्रकांत जाधव, प्रदिप रेणुसे यांचे पथक उज्जैन येथे गेले. त्यांनी तेथे जाऊन तांत्रिक विश्लेषण करुन आरोपी रहात असलेल्या लॉजची माहिती काढली. त्या ठिकाणी वेशांतर करुन त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, महेश मंडलिक, चंद्रकांत जाधव, प्रदिप रेणुसे, सागर सुतकर, बजरंग पवार, किरण कांबळे, अमित पदमाळे, योगेश ढोले, महेश भगत, आकाश किर्तीकर, खंडु शिंदे यांनी केली आहे.