पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | मित्राची आई रुम खाली करणार असल्याने सामान हलविण्यासाठी ते तिघे मदतीला गेले होते. त्यावेळी तेथे मित्राच्या आईचा एका बरोबर वाद सुरु होता. त्यांचे भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्याने या तिघा तरुणांवर चाकूने छातीत, फुफ्फुसावर वार करुन गंभीर जखमी केले.
याबाबत प्रदिप ऊर्फ प्रणव पांडुरंग कुदांडे (वय १९, रा. मानाजीनगर, नर्हे) यांनी नांदेडसिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुनिल महादेव चव्हाण (रा. स्वागत लॉजचे मागे, किरकटवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना किरकटवाडी येथे १२ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली. श्रेयस ढमाळ आणि समाधान क्षीरसागर यांच्या छातीत आणि फुफ्फुसामध्ये खोलवर जखम झाली असून त्यांच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार केला जात आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र रोहित कांबळे याने फोन करुन रात्री बोलावले. त्याची आई किरकटवाडी येथे राहते. तिला रुम शिफ्ट करायची आहे. सामान हलविण्यासाठी येतोस का असे कांबळे याने विचारले. त्यानुसार फिर्यादी प्रदिप, रोहित आणि त्यांचे दोन मित्र श्रेयस ढमाळ, समाधान क्षीरसागर हे दोन गाड्यावरुन किरकटवाडी येथे गेले. इमारतीच्या तिसर्या मजल्यावरील रोहित कांबळेच्या आईचा सुनिल चव्हाण याच्याबरोबर वाद सुरु होता. तो रोहितच्या आईला ६ हजार रुपये मागत होता. तेव्हा ते जिन्याने इमारतीच्या खाली आले.
त्यांनी त्यांच्यातील भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग येऊन सुनिल चव्हाण याने खिशातून धारदार चाकू काढून त्याने प्रदिप याच्या हातावर, पोटरीवर, पाठीवर वार केले. प्रदिप याच्या हातातून रक्त येत असल्याचे पाहून श्रेयस ढमाळ व समाधान क्षीरसागर हे पुढे झाले. चव्हाण याने दोघांच्या छातीत जोरात वार केले. त्यामुळे तिघे जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेतून भारती हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले. अधिक चौकशी केली असता रोहित याची आई रुम सोडून जात असल्याने सुनिल चव्हाण हा बचत गटाचे ६ हजार रुपये दे, मग जा, असे सांगत होता. त्यावरुन भांडणे झाली होती, असे सांगण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक यादव तपास करीत आहेत.