पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | सराफाच्या दुकानात शिरुन तिघा चोरट्यांनी खेळण्यातील पिस्तुलाचा धाक दाखवून २५ ते ३० तोळ्याचे दागिने लुटून नेण्याची घटना मंगळवारी भर दुपारी धायरीत घडली. (Robbery Case)
धायरीतील रायकर मळा येथील काळुबाई चौकातील श्री ज्वेलर्स या सराफी दुकानात मंगळवारी दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी ही घटना घडली. दुपारच्या वेळी वीज पुरवठा खंडीत झाला असताना चोरट्यांनी ही संधी साधत दरोडा घातला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री ज्वेलर्सचे मालक विष्णु सखाराम दहिवाल व त्यांचा एक कामगार दुपारी दुकानात होते. त्यावेळी एक जण दुकानात आला. त्याने सोन्याची चैन दाखवा, असे सांगितले. त्यावरुन मालक विष्णु दहिवाल हे सोन्याची चैन दाखवत होते. त्याचवेळी आणखी दोघे जण आत आले. तिघांनी मिळून दहिवाल यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी देऊन शिवीगाळ केली. दुकानातील २५ ते ३० तोळ्याचे सोन्याचे दागिने गोळा केले. दहिवाल यांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता तिघांनी त्यांना हाताने मारहाण करुन व पिस्टलच्या बॅटनने मारहाण करुन दुचाकीवरुन पळून गेले. त्यांच्या हातातील नकली पिस्तुल तुटून दुकानात पडले होते.
या घटनेची माहिती मिळताच नांदेड सिटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांचे वर्णन विष्णु दहिवाल यांनी पोलिसांना दिले आहे. पहिला चोरटा हा अंदाजे ३५ वर्षाचा असून त्याने लाल रंगाचा हाफ टी शर्ट, निळी जिन्स पँट घातली होती. दुसरा चोरटा अंदाजे २५ वर्षाचा असून त्याने गोल गळ्याचा फुल काळा टी शर्ट, तोंडावर मास्क लावलेला, काळ्या रंगाची पँट घातली होती. तिसरा चोरटा अंदाजे २५ वषार्चा असून क्रीम रंगाचा फुल बाह्याचा गोल गळ्याचा टी शर्ट, पांढर्या रंगाची जिन्स पँट, पांढरे शुज डोक्यावर खाकी रंगाची कॅप, पाठीवर काळ्या रंगाची बॅग घेतली होती. त्यांच्याकडील पिस्तुल हे नकली असल्याचे आढळून आले.
दरम्यान, हा दरोड्याचा प्रकार घडला त्यावेळी नेमका वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे दुकानातील सीसीटीव्ही तपासून पाहिले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच शहरात नाकेबंदी करुन पोलिसांनी परिसरात वाहनांची तपासणी सुरु केली आहे.