Pune News : लक्ष्मीनारायण थिएटरजवळ पेपर विक्रेत्याच्या पोटाला चाकू आणि तलवारीच्या धाकाने लुटले; रहदारीच्या वेळीच घटना घडल्याने प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्यातील स्ट्रीट क्राईमला लगाम घालण्यास पोलिसांना हवे तसे यश मिळत नसून आज ऐन रहदारीच्या वेळीच लक्ष्मीनारायण थिएटरजवळ एका पेपर विक्रेत्याच्या पोटाला चाकू आणि तलवार लावून फायटरने मारहाण करून 90 हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.

याप्रकरणी शंकर अण्णा खुटवड (वय 50, शिवशक्ती हाइट्स चैतन्य नगर धनकवडी) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन सोंडकर उर्फ घाऱ्या याच्यासह तीन अनोळखी व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पेपर विक्रीचा व्यवसाय आहे. दरम्यान घाऱ्या उर्फ सचिन हा फिर्यादी यांना ओळखतो. त्याला फिर्यादी यांच्याकडे बॅगेत रोकड असते, याची माहिती होती. आज (दि. 4 मार्च) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे  लक्ष्मीनारायण थिएटर समोर असणाऱ्या पुलाखाली पेपर विक्रीकरिता थांबले होते. यावेळी त्यांच्याजवळ असलेल्या शबनम बॅगेत बँकेत भरण्यासाठी 90 हजार 300 रुपये होते. याचवेळी शाईन या दुचाकीवरून तीन व्यक्ती येथे आल्या त्यातील एकाने गाडीवरून खाली उतरत फिर्यादी यांच्या समोर असलेली शबनम बॅग हिसकावली व गाडीवर बसून पळून गेला. यावेळी फिर्यादीने आरडाओरडा केला असता पेपर विकत घेण्यासाठी आलेले प्रीतम अनिल पिंपळे यांनी चोरट्यांचा पाठलाग करून दुचाकीवर लाथ मारली. यामुळे दुचाकी खाली पाडली.

पिंपळे यांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. पण एकाने त्यांच्या तोंडावर फायटरने मारले. तर दुसऱ्याने चाकू काढून पिंपळे यांच्यावर उगारला. तर तिसर्‍या व्यक्तीने पिंपळे यांना तलवारीचा धाक दाखवला आणि तिघेही पळून गेले. दरम्यान, चोरट्यांची खाली पडलेली दुचाकी आरोपी घाऱ्या उर्फ सचिन सोंडकर याने पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे घाऱ्या याने फिर्यादी यांच्या ओळखीचा फायदा घेऊन त्यांना बोलण्यात गुंतून इतर तिघांना हे कृत्य करण्यास भाग पाडले असावे असा संशय फिर्यादीना आहे. त्यावरून त्यांनी या चौघांविरुद्ध दत्तवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक लोहार करत आहेत.