Pune : गुंगीचा पेढा देऊन महिलेकडील अडीच लाखाचे दागिने लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एसटी प्रवासात शेजारी बसलेल्या महिलेने गुंगी येणारा पेढा खाण्यास देऊन महिलेला गुंगी आल्यानंतर तिला रुग्णालयात घेऊन जाऊन त्याठिकाणी एक्सरे काढताना गळ्यातील दागिने काढयला लावत अडीच लाख रुपये किंमतीची बॅग चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सुरेखा सुग्रीव जाधव (वय 50) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना पुण्यात यायचे होते. त्या मूळच्या मुंबई येथील आहेत. त्या दादर बस स्थानकावरून पुण्याच्या एसटीत बसल्या. यावेळी त्यांच्या शेजारी एक महिला येऊन बसली. त्या महिलेने बोलत बोलत त्यांना पेढा खाण्यास दिला. फिर्यादी यांनी पेढा खाल्ल्यानंतर त्यांना गुंगी आली. तसेच त्यांची जीभ देखील जड झाली होती. पुणे बस स्थानकावर आल्यानंतर आरोपी महिलेने फिर्यादी यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे गेल्यानंतर तुमचा एक्स-रे काढायचा आहे, असे सांगून फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून फिर्यादीच्या बॅगमध्ये ठेवले. फिर्यादीने ही बॅग विश्वासाने आरोपी महिलेजवळ दिल्यानंतर महिला पसार झाली. अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.