Pune : वानवडीत स्वयंघोषित भाईंकडून दुकानदारास शिवीगाळ, कोयत्याच्या धाकाने रक्कम लुटली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   वानवडीत स्वयंघोषित भाईंनी तुफान राडा घालत बंद दुकान उघडण्यास लावत दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवून खिशातील साडे तीन हजार रुपये काढून घेत नागरिकांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी इलायीस अन्सारी (वय 40) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे रामटेकडी येथे बेकरी आहे. दरम्यान लॉकडाऊन असल्याने 11 नंतर बेकरी बंद केली होती. यावेळी तिघेजण हातात कोयते घेऊन आले. त्यांनी फिर्यादी यांच्या दुकानाच्या शटरवर दगड मारून दुकान उघडण्याड सांगितले. पण, त्यांनी नकार दिला असता त्यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांना हाताने मारहाण केली. तर एकाने कोयता काढत “आम्ही कोण आहे, तुला माहीत नाही का,” दुकान उघड नाहीतर खल्लास करतो असे धमकावत खिशातील 3 हजार 500 रुपये काढुन घेत राडा घातला. या गोंधळामुळे परिसरात गर्दी जमली होती. त्यावेळी त्यांनी दगडफेक करत हातातील कोयते भरकावून दहशत माजवली. अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.