पुण्यात किरकोळ कारणावरून तुरूणाची दुचाकी जाळली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   कारला दुचाकी आडवी मारल्याच्या रागातून चालकाने तरुणाची दुचाकी जाळल्याची धक्कादायक घटना घडली. पुणे-सासवड रस्त्यावरील भेकराईमाता मंदीराजवळ ही घटना घडली आहे. चालक दारू प्यायला असल्याने तरुण भीतीपोटी तेथून गेला होता.

याप्रकरणी समाधान गोरे (वय २८, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान एका खासगी कंपनीत कामाला आहेत. दोन दिवसांपुर्वी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवर फुरसुंगीच्या हद्दीतून चालले होते. त्यावेळी पाठीमागून कारमधून आलेल्या चालकाने त्यांना थांबविले. तू कारला दुचाकी आडवी का मारली अशी विचारणा केली. त्यातून त्यांच्यात वाद झाला. यावेळी कार चालक दारु प्यायलेला असल्याने फिर्यादी हे मारहाण करण्याच्या भीतीमुळे समाधान तेथून पळून गेला. त्यानंतर कार चालकाने दुचाकी भेकराईमाता मंदीराजवळ नेउन पेटवून दिली. अधिक तपास उपनिरीक्षक आर. एस. ढावरे करीत आहेत.