पुणे : Pune Crime News | मंगळसुत्रासाठी लागणारी सोन्याची बारीक तार रविवार पेठेतील कमल मंडल गोल्ड येथे देण्यासाठी जात असलेल्या युवकाला अडवून त्याला मारहाण करुन खिशातील ३ लाख रुपयांचे सोने दोघा चोरट्यांनी चोरुन नेले. ऐन गर्दीच्या वेळी शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला. (Robbery Case)
याबाबत भरत देवाराम मिना (वय १८, रा. रविवार पेठ, मुळ रा. कुलथाना, राजस्थान) यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता रविवार पेठेतील (Raviwar Peth Pune) तांबोळी मस्जिदकडे जाणार्या रस्त्यावर घडला.
https://www.instagram.com/p/DI-7JK6pS0y/
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत मिना हा १५ दिवसांपूर्वी राजस्थानमधून आला आहे. नाना पेठेतील दुकानमालक अरविंद मनोहर सिंह या सोने कारागीराकडे ते सोन्याचे दागिने बनवण्याचे काम शिकत आहे.
अरविंद सिंह यांनी भरत मिना याला २६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता रविवार पेठेतील कमल मंडळ गोल्ड याचे ऑर्डरप्रमाणे तयार केलेली मंगळसुत्रासाठी लागणारी सोन्याची बारीक तार नेऊन देण्यास सांगितले. त्याप्रमाणे मिना हे सायकलवरुन तांबोळी मस्जिदकडे जाणार्या रस्त्याने जात असताना पावटेकर ब्रदर्स यांच्या दुकानासमोर ते आले असताना दोघांनी त्यांची सायकल अडवली. त्यावेळी सायकल रस्त्यावर पडून त्यांची झटापट चालू असताना आणखी एक जण आला. तोही त्यांच्याशी झटापट करु लागला. त्यांना पकडून या मुलांनी त्यांच्या खिशातील ३ लाख रुपयांची सोन्याच्या दोन तारा जबरदस्तीने घेऊन ते पळून गेले. या प्रकाराने घाबरुन मिना हे दुकानमालकाकडे जाऊन त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक शिवराज हाळे तपास करीत आहेत.