ऑफिसमध्ये डांबून ठेवून ‘त्या’ तरुणाचा ५ लाखांचा ऐवज लांबविला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ऑफिसमध्ये आल्यावर तरुणाला तेथे डांबून ठेवून चौघांनी त्याच्या बँकेतील ४ लाख ७० हजार रुपये व अंगावरील दागिने जबरदस्तीने काढून घेण्याचा प्रकार हिंंजवडीमध्ये घडला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी संदीप नरसिंह राव तल्लुरी (वय ३२, रा. ब्लुरिच, हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अंगज, रिझवान, शागुत्ता अब्दुल करीम यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हिंजवडीतील ब्लुरिच सोसायटीच्या ऑफिसमध्ये २ जून रोजी दुपारी ४ वाजता घडला.

संदीप तल्लुरी हे ब्लरिचच्या ऑफिसमध्ये सामान आणण्यासाठी गेले असताना त्याच ठिकाणी राहणाऱ्या चौघांनी त्यांना जबरदस्तीने डांबून ठेवले. त्यांच्या अ‍ॅक्सीस बँकेच्या डेबीट कार्डमधून ९० हजार रुपये व आयसीआयसीआय बँकेच्या डेबीट कार्डमधून १ लाख रुपये तसेच आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डमधून १ लाख ९० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

ते त्यांच्या बेदी गेस्ट हाऊस मध्ये जमा करुन घेतले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी, हातातील सोन्याची आंगठी व खिशातील ५ हजार रुपये रोख असा ४ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. हिंजवडी पोलिसांनी जबरी चोरीला गुन्हा दाखल केला आहे.