Pune : गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा; 21 वर्षीय तरूणीशी अश्लील वर्तन अन् लावला होता नको तिथं हात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दणक्यात कारवाई करणाऱ्या गुन्हे शाखेतील ‘त्या’ निलंबित उपनिरीक्षकावर विनयभंग आणि पॉस्कोचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षकाने मद्यपान केल्यानंतर डांगडिंग करत 21 वर्षीय मुलीच्या प्रायव्हेट पार्टला हात लावून विनयभंग केला होता. बेकायदेशीर रेमडेसिवीर विक्री प्रकरणात कारवाई केल्यानंतर आरोपींच्या नातेवाईकांबरोबर ओली पार्टीला गेल्यानंतर हा प्रकार घडला होता.

याप्रकरणी निलंबित उपनिरीक्षक दीपक माने यांच्यावर चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 21 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. उपनिरीक्षक माने हे युनिट चार येथे नेमणुकीस आहेत. गेल्या आठवड्यात (दि. 17) चतुःश्रृंगी परिसरात युनिट चारने रेमडेसिवीर इंजेक्शन विक्री करण्यास आलेल्या दोन सख्या भावाना अटक केली. तर त्यांच्याकडून दोन इंजेक्शन जप्त केले होते. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर उपनिरीक्षक माने यांची यातील आरोपींच्या नातेवाईक असलेल्या व्यक्तीशी ओळख झाली. त्यानंतर माने हे त्यांच्यासोबत पार्टीसाठी गेले होते. मद्यपान केल्यानंतर माने यांनी तक्रारदार तरूणीच्या 16 वर्षीय बहिणीस बोलावले. तक्रारदार तरूणीशी अश्लील वर्तन केले तसेच उपनिरीक्षक माने यांनी तक्रारदार तरूणीच्या प्रायव्हेट पार्टला हात लावून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न केली. तसेच माने यांनी तक्रारदारच्या बहिणीचा हात धरून तिला जवळ ओढून तिच्या छातीस दाबले.

दरम्यान, ही तक्रार आल्यानंतर तडकाफडकी माने यांना निलंबित करण्यात आले होते. तर, मुलींनी तक्रार देताच चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चतुःश्रृंगी पोलीस करत आहेत.