सराईत गुन्हेगार पुणे पोलिसांच्या जाळ्यात, 9 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराच्या अलंकार पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून गुन्ह्यातील सोन्याची बिस्कीटे आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून 9 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई यश हॉस्पिटलजवळ करण्यात आली. बापू रोहिदास कांबळे (रा. शास्त्री नगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

अलंकार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस नाईक लांडगे आणि पोलीस शिपाई राऊत, बडगे यांना चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार यश हॉस्पिटलजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून आरोपी बापू कांबळे याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीमध्ये त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून 7 लाख 50 हजार रुपये किंमतीची 300 ग्रॅम वजनाची तीन सोन्याची बिस्कीटे, 1 लाख 70 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 9 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पश्चिम विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, परिमंडळ – 3 चे पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सिंहगड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पी. डी. राठोड, अलंकार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्पना जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरज किरण गोरे, पोलीस नाईक राजेंद्र लांडगे, प्रफुल्ल चव्हाण, संदीप धनवटे, किरण राऊत, योगेश बडगे यांच्या पथकाने केली आहे.