त्रास देणार्‍यांना समज देण्यास गेलेल्या युवकास बेदम मारहाण

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – वडिलांना त्रास देणार्‍या टोळक्याला समजावण्यास गेलेल्या 20 वर्षाच्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

याप्रकरणी शिवम मारणे (वय 20, रा. गणेशनगर, मेंहदळे गॅरेजजवळ) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नरेंद्र उर्फ छोट्या बलकवडे, बंटी लोहार व त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नरेंद्र उर्फ छोट्या बलकवडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. दरम्यान, आरोपी व फिर्यादी ओळखीतील आहेत. आरोपी हे फिर्यादी शिवम याचे वडिल प्रसाद मारणे यांना विनाकारण त्रास देत होते. त्यामुळे शिवम हा त्यांना त्रास का देता हे समजावण्यास तसेच त्रास देऊ नका हे सागण्यास गेल्यानंतर त्याला हाताने मारहाण केली. त्यानंतर त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. अधिक तपास अलंकार पोलीस करत आहेत.