Pune : मार्केटयार्ड परिसरात दहशत निर्माण करणार्‍या ‘शाहरूख’ची रवानगी येरवडा कारागृहात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   मार्केटयार्ड भागात सर्व सामान्य नागरिकांच्या मनात दहशत माजवणाऱ्या शाहरुखला पोलीस आयुक्तांनी एक वर्षांसाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे.

शाहरुख उर्फ चांग्या मेहबूब खान (वय 26, आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) असे कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे.

शहरातील गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस आयुक्तांनी कडक धोरण स्वीकारले आहे. गुन्हेगारांवर वचक बसविला जात असून, कडक कारवाईला प्राधान्य दिले जात आहे. तश्या सूचना सर्वांना देण्यात आले असून, गुन्हेगारांची गय करू नये असे स्पष्ट केले आहे.

दरम्यान शाहरुख उर्फ चांग्या हा मार्केटयार्ड पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तयाच्यावर घातक शस्त्र बाळगत त्याने अपहरण, जबरी चोरी, चोरी, घरफोड्या व हत्यार बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. त्याची या परिसरात दहशत होती. त्याच्यावर 8 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशती कृत्यामुळे येथील कायदा व सुव्यवस्था बाधा निर्माण झाली होती. तर त्याच्याविरुद्ध कोणी तक्रार देण्यास देखील पुढे येत नव्हते.

त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, पोलीस निरीक्षक सुविता ढमढेरे यांनी त्याला स्थानबद्ध करावे, असा प्रस्ताव परिमंडळ पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडे पाठवला होता. त्यांनी छाननीकरून प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी त्याच्यावर एमपीडीएनुसार कारवाई करत त्याला एक वर्षांसाठी स्थानबद्ध केले आहे.

पोलीस आयुक्तांनी गेल्या सात महिन्यात 20 सराईत गुन्हेगारांवर एमपीडीएनुसार कारवाई करत त्यांना 1 वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. तसेच, यापुढेही कडक कारवाई करण्याचे सांगण्यात आले आहे.