Pune : शनिवार-रविवारच्या सुटीनंतर संचारबंदीत देखील हडपसरमध्ये खरेदीसाठी उसळली गर्दी; वाढू शकतो कोरोनाचा प्रादुर्भाव

पुणे : कोरोना महामारी नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. त्यामुळे शुक्रवार ते सोमवारपर्यंत सकाळी 7 ते 11, तर शनिवार-रविवार अत्यावश्यक सेवा वगळता व्यवहार ठप्प असतात. त्यामुळे विकेंडच्या पाचव्या सोमवारी (दि. 10 मे) सकाळी सात वाजल्यापासून हडपसर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी लोटली होती. किराणा मालाची दुकाने, भाजीपाला, दूध, स्वीट होम, तसेच पदपथावर कपडे, पादत्राणे विकणाऱ्यांकडे खरेदीदारांची मोठी गर्दी झाली होती.

हडपसर गाडीतळ, गांधी चौक, मगरपट्टा चौक, रामटेकडी, मुंढवा, केशवनगर, मांजरी, शेवाळेवाडी, फुरसुंगी, देवाची उरुळी, लोणी काळभोर, उरुळी कांचन परिसरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड मिळविण्यासाठी रुग्णालयांकडे विनवन्या कराव्या लागत आहेत. त्यानंतर औषधे मिळत नाहीत, त्यामुळे पुन्हा धावाधाव करावी लागत आहे. उपचार सुरू असतानाच हॉस्पिटल व्यवस्थापन पैसे भरण्यासाठी तगादा लावत आहे. कारण डिस्चार्ज देताना पैशासाठी तूतू मैमै करण्यापेक्षा अगोदरच पैसे काढून घेण्याचा मार्ग रुग्णालयांनी अवलंबला आहे.

कोरोना महामारी आणि लॉकडाऊन किती दिवस राहणार वाढणार का, याविषयी नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. दूरचित्रवाणीवरील आणि वृत्तपत्रांमधील बातम्यांबरोबर सोशल मीडियातील बातम्यांवर उलटसुलट चर्चेला उधाण येऊ लागले आहे. त्यामुळे सध्या तरी कोरोना या एकाच विषयाने गंभीर रूप धारण केले आहे. सोसायटीतील शेजारीपाजारी, गावाकडे, नातेवाईक कोणी पॉझिटिव्ह आहेत का, असतील तर त्यांना काळजी घ्या, वेळेत उपचार करा असा सल्ला भ्रमणध्वनीवरून दिला जात आहे. प्रत्येकजण आहे तेथेच थांबा, फिरू नका, कामाशिवाय कुठेही जाऊ नका असा सल्ला आवर्जून देत आहेत.