Pune : रविवार सुटीचा दिवस असूनही हडपसरमध्ये लसीकरणासाठी गर्दी

पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन – रविवार सुटीचा दिवस असूनही कोरोनाची लस घेण्यासाठी हडपसरमधील खासदार स्व. अण्णासाहेब मगर रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली होती. शनिवारी (दि.17) लसीकरण बंद होते. त्यामुळे आज लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची रांग रुग्णालयाबाहेर आली होती. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावून नागरिकांनी स्वतःच नियम पाळल्याचे दिसून आले, ही बाब निश्चितच समाधानाची वाटली.
शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे सकाळी 6 ते 11 पर्यंत दूध-अंडी विक्री वगळता सर्व व्यवहार बंद होते. रविवार सुटीचा दिवस आणि कोरोनाची भीती, उन्हाचा कहर वाढत असल्याने बहुतेक सर्वच मंडळींनी घरात थांबणे पसंत केले. रुग्णांचे नातेवाईक आणि औषधे खऱेदी करणारा वर्ग मेडिकलमध्ये ये-जा करीत असताना दिसत होता. हॉस्पिटलपर्यंत रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका धावत होत्या. रविवार सुटीचा आणि कडक लॉकडाऊनचा दिवस असल्याने नागरिकांची वर्दळ कमी होती.

हडपसर गाडीतळावर पोलीस व्हॅनसह पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. भाजीविक्रेत्यांनीही आज सकाळी दहा-साडेदहालाच दुकाने बंद करून घर गाठले होते. फळविक्रेत्यांना झाडांच्या सावलीचा आडोसा गेत काही ठिकाणी विक्री सुरू ठेवली होती. रस्त्यावर बाहेरगावी जाणारी आणि येणारी वाहने धावताना दिसत होती. त्यामध्ये रुग्णवाहिका सुसाट वेगाने धावत होत्या.

उन्हाची आणि कोरोनाची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांनी घरामध्ये थांबणे पसंत केले, त्यामुळे हडपसर आणि परिसरातील रस्त्यावर सन्नाटा दिसत होता. हडपसर बाजार पेठेतील दुकानदारांनी कडकडित बंद पाळला, मटण-चिकन-मासळीची दुकानेही बंद होती. त्यामुळे सामिष खवय्यांचा हिरमोड झाला.

मागिल आठवड्यातही विकेंडला (शनिवार-रविवार) कडक लॉकडाऊन होते. त्यानंतर लगेच 15 तारखेपासून 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. आज विकेंडच्या दुसऱ्या टप्प्यात कडक लॉकडाऊनमुळे चिकन-मटण-मासळीची दुकाने बंद असल्याने खरेदीदारही घराबाहेर पडले नाहीत. कोरोनाच्या भीतीने मॉर्निंग वॉकही अनेकांनी टेरेस व गॅलरीमध्येच सुरू केले आहेत.