सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई ! 65 लाखांचा 412 किलो गांजा जप्त

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – सीमा शुल्क विभागा(Customs Department)च्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने नळदुर्ग – सोलापूर महामार्गावर गांजा वाहतूक करणारा ट्रक पकडला या ट्रकमध्ये ६५ लाख रुपयांचा ४१२ किलो गांजा आढळून आला आंध्रप्रदेशातील खम्मम जिल्ह्यातून हा गांजा राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाठविण्यात येणार होता. ट्रकमधील चालक व इतर जण ट्रक सोडून पळून गेले.सीमा शुल्क विभागा(Customs Department)च्या अधिकाऱ्यांनी गांजा वाहतूक केल्या जाणाऱ्या वाहनांचा तपशील माहिती नसताना वेगवेगळ्या ठिकाणाहून संकलित केलेली माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आधारे या गुन्ह्यात सहभागी झालेले वाहन शोधून काढले.

नळदुर्ग -सोलापूर रस्त्यावर ३ ऑक्टोबरपासून गस्ती सुरु केली होती. नाकाबंदी करुन येणारी सर्व वाहने तपासणी करण्यात येत होती. ४ ऑक्टोबरला सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तांदुळवाडी येथे सर्व वाहने तपासण्यात येत होती.

यावेळी नळदुर्गकडून आलेला एक ट्रक ढाब्यासमोर उभा असलेला आढळून आला. त्याची दोन्ही दारेही उघडी होती. तसेच ट्रकही चालू स्थिती सोडून दिलेला आढळून आला. अधिकाऱ्यांनी आजू बाजूला चौकशी केल्यावर त्याविषयी कोणाला कल्पना नव्हती. ट्रकची तपासणी केल्यावर ट्रकच्या छतावरच्या भागात एक विशिष्ट प्रकारची पोकळी तयार करुन त्यात कागद आणि प्लॅस्टिक चिकटपट्टीने गुंडाळलेली पाकिटे आढळून आली .

या दरम्यान ६५ लाखांच्या गांजा व ट्रकसह ८५ लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. सीमा शुल्क आयुक्त पी .के. बोरा, सह आयुक्त वैशाली पंतगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अलोक कुमार , सिंग, अधीक्षक मदन देशमुख, पावन करवंदे, प्रमोद जाधव, वरिष्ठ निरीक्षक अमजद शेख, हवालदार भरत पवार यांनी ही कारवाई केली आहे.