पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुणेकरांना टेक्नोसॅव्ही असं गर्वानं म्हंटलं जात असले तरी याच टेक्नोसॅव्ही नागरिकांची स्मार्ट सायबर चोरटे तितक्याच गोड गप्पा मारत फसवणूक करत असल्याचे दिसत आहे. शहरातला आतापर्यंतचा फसवणूकीचा उच्चांक केवळ 8 महिन्यात झाला आहे. सायबर चोरट्यांच्या तबल 10 हजार तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. या फक्त पोलिसांकडे आलेल्या तक्रारी आहेत. पण पोलिसांपर्यंत न पोहचलेल्यांची गणती वेगळीच आहे. या माध्यमातून चोरट्यांनी कोट्यवधी रुपयांचा चुन्ना लावला आहे. त्यामुळे टेक्नोसॅव्ही पुणेकरांनी आता तरी सावध होत या आमिषाला बळी पडू नये. पुणे पोलीस सतत याबाबत जनजागृती करत असताना या घटना वाढत आहेत. त्याला नागरिकच जबाबदार आहेत.
राज्यसोबतच देश-विदेशातून पुण्यात नोकरी, व्यवसाय व शिक्षणाच्या निमित्ताने हजारोजण वास्तव्याला आहेत. त्याचा फायदा सायबर चोरटे घेत असून, त्यांनी जणू काही पुणेकरांना टारगेट केले आहे. त्यानुसार नागरिकांना विविध आमिषे दाखवून ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रकार सुरू आहेत. सायबर चोरटे विदेशातील गिफ्ट, नोकरी, महागड्या वस्तू, जादा परतावा, इन्शुरन्स पॉलिसी, डॉलर, पेटीएम व बँक खाते अपडेट करण्याच्या बहाण्याने फसवणूक करीत आहेत. या चोरट्यांनी शहरात अक्षरशः धुमाकूळ घातला असल्याचे दिसत आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा अवघ्या आठ महिन्यांत १० हजार तक्रारींची नोंद सायबर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
पुणे पोलीसांचा सायबर विभाग सतत जनजागृती करुन नागरिकाना या आमिषाना बळी पडू नये यासाठी काम करत आहे. पण याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. यात सुशिक्षित व आम्ही सुरक्षित समजणारे नागरिकही सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. ओटीपी शेअर करणे, ऑनलाईन शॉपिंग, हर्बल ऑईल, व्यवसायाचे आमिष, लोन देण्याच्या बहाण्याने सर्वसामान्य नागरिकांकडून बँकखात्याची गोपनीय माहिती विचारुन गंडा घातला जात आहे.
सायबर पोलिस ठाण्यात मागील आठ महिन्यांत सर्वाधिक ३ हजार ४१४ तक्रारी डेबीट आणि क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतरही नागरिकांकडून कोणताही धडा घेतला जात नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नोकरी, लॉटरी, महागडे गिफ्ट, मोबाईल टॉवर बसवणे, टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सच्या नावाखाली सर्रासपणे ऑनलाईन फसवणूक केली जात आहे. बँकखात्यातून ऑनलाईनरित्या रक्कम कमी झाल्यानंतर नागरिकांकडून पोलिसांकडे धाव घेतली जात आहे. त्यामुळे अतिहव्यास नागरिकांना आर्थिक लुटमारीकडे ढकलत असल्याचे दिसत आहे.
आठ महिन्यातील तक्रारी…
डेबीट व क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक – ३ हजार ४१४
ऑनलाईन बिझनेस घोटाळा -२१ हजार ७६३
सोशल नेट्वर्किंगमधून अश्लीलता – १ हजार ३०७
हॅकिंग संदर्भात – २११
ऑनलाईन मोबाईल गुन्हे -२६१
इतर सायबर गुन्हे – २६२