‘मॅन इन मिडल’च्या माध्यमातून गेलेले ३.५ कोटी कंपनीला ‘सायबर सेल’मुळे ‘रिफंड’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – उद्योग क्षेत्रात पुरवठादार आणि मागणीदार यांचे इमेल आयडी हॅक करून कोट्यावधी रुपयांचा गंडा घातला जातो. असाच एक गुन्हा मागील महिन्यात पुणे सायबर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. सायबर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून फसवणूक झालेल्या पुण्यातील एस.आर.सी. केमीकल कंपनीचे ३ कोटी ४१ लाख रुपये परत मिळवून दिले आहे. पुणे सायबर सेलने यापूर्वी अशाच प्रकारे फसवणूक झालेल्या एका नामांकीत कंपनीचे ४ कोटी ५० लाख रुपये परत मिळवून दिले होते. अशा प्रकारच्या फसवणूकीला सायबरच्या भाषेत ‘मॅन इन मिडल’ असे म्हटले जाते.

एस.आर.सी. कंपनीने भारतीय चलनानुसार ३ कोटी ४१ लाख रुपये एचडीएफसी बँकेतून मेक्सिको येथील बँको मार्कंटाईल डेल नॉर्टे (बेनॉर्ट) बँकेत पाठवले होते. रक्कम पाठवल्यानंतर ज्या ईमेल द्वारे रक्कम पाठवली तो ई-मेल बनावट असल्याचे निदर्शनास आल्याने फसवणूक झाल्याचे कंपनीच्या लक्षात आले. कंपनीने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कंपनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी मेक्सिको येथील बँको मार्कंटाईल डेल नॉर्टे (बेनॉर्ट) बँकेशी पत्रव्यवहार करून झालेला प्रकार सांगितला. पोलिसांनी केलेल्या पत्रव्यवहारामुळे बँकेने कंपनीने पाठवलेले ३ कोटी ४१ लाख रुपये कंपनीला रिफंड केले.

हि कारवाई पोलीस उपायुक्त आर्थिक व सायबर संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहायक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, पोलीस शिपाई प्रसाद पोतदार यांच्या पथकाने केली.

मॅन इन मिडल म्हणजे काय ?

माहिती तंत्रज्ञान व संपर्क साधनांच्या प्रगतीमुळे सामान्यत: उद्योग क्षेत्रात पुरवठादार व मागणीदार यांच्यात होणारा व्यवहार हा ईमेलवर चालतो. या दोघांपैकी कोणत्याही एकाचा ईमेल हॅक झाल्यास हॅकरला या दोघांमध्ये होणाऱ्या संभाषणाबाबत व आर्थिक व्यवहाराबाबत संपूर्ण माहिती मिळते. याच माहितीचा वापर करून हॅकर फसवणूक करतात. जेव्हा पुरवठादार आणि मागणीदार यांच्यात एखादा व्यवहार ठरतो त्यावेळी हॅकर मागणीदाराला पुरवठादाराच्या ईमेल आयडी सारखा, ज्यामध्ये नावाच्या स्पेलिंगमध्ये सहजासहजी ओळखू न येणारा बदल करून पुरवठादाराची ओळख पटवून देतो. बदल केलेल्या ईमेल आयडीद्वारे मागणीदारास संपर्क करून त्याला पुरवठादाराचे मुळ बँक खाते हे काही कारणास्तव वापरता येत नसल्याचा मेल पाठवला जातो. मेल आयडीमध्ये झालेला बदल मागणीदाराच्या सहजासहजी लक्षात न आल्याने मागणीदार मेल आयडीमध्ये सांगितलेल्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवतो. यालाच सायबर क्राईमच्या भाषेत ‘मॅन इन मिडल’ म्हटले जाते.

अशी घ्यावी काळजी

उद्योजकांनी वस्तु भारतातील किंवा परदेशातील कंपनीकडून मागवली असेल. तसेच ते ईमेलवर संपर्कात असाल तर पैसे पाठवण्यापूर्वी कंपनीशी फोनद्वारे संपर्क साधून त्यांनी पाठवलेल्या बँक खात्याची खात्री करून घेऊन मगच पैसे पाठवावेत. आपले ईमेल अकाऊंट सुरक्षित करुन वेळोवेळी ते सुरक्षित आहे का हे पडताळून पहावे. जर आपली फसवणूक झाली असेल तर तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात याची तक्रार दाखल करावी.

Loading...
You might also like