नेट बॅकिंगद्वारे तरुणाला सायबर चोरट्यानी घातला 18 लाखाचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोथरूड भागातील एका तरुणाला सायबर चोरट्यांनी मोबाईल सीमकार्ड अपग्रेड करण्याची बतावणी करुन नेट बेकिंगची माहिती घेत तब्बल १८ लाख २५ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. त्यामध्ये १ लाख ८० हजार बँकेतील रकमेचा समावेश आहे. उर्वरित १६ लाख ४५ हजार रुपये तातडीने पर्सनल लोन मंजूर करुन घेत फसवणूक केली आहे. ही घटना ६ ते १६ मेदरम्यान घडली आहे.

पोलिस वारंवार भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन करत असताना या घटना घडत आहेत.

याप्रकरणी सचिन कुलकर्णी (वय ४५, रा. कोथरुड) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयटी ऍक्ट व फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन एका आयटी कंपनीत नोकरीस आहे. भांडाकर रस्त्यावरील एका खासगी बँकेत खाते आहे. ६ मे ला सचिन कामावर असताना त्यांना एक फोन आला. मोबाईल कंपनीतून बोलत असून तुमचे सीमकार्ड अपग्रेड करुन देतो असे त्याने सांगितले. त्यानुसार सीमकार्डच्या प्रक्रियेसाठी सायबर चोरट्याने सचिन यांच्याकडून नेट बँकिगची गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर चोरट्याने सचिनच्या बँक खात्यातून ऑनलाईनरित्या १ लाख ८० हजार रुपये स्वतःच्या खात्यात वर्ग करुन घेतले. कामात असल्यामुळे सचिनला बँकेतून पैसे कमी झाल्याची माहिती मिळाली नाही.

त्यानंतर सायबर चोरट्याने सचिनच्या नेट बँकिंग अकाउंटवरुन संबंधित बँकेकडे पर्सनल लोनसाठी अर्ज केला. बँकेने खातेधारक सचिन असल्याचे समजून तातडीने १६ लाख ४५ हजार रुपये मंजूर केले. त्यानंतर सायबर चोरट्याने तातडीने मंजूर झालेले लोण स्वतःच्या बँकखात्यात वर्ग करुन तब्बल १८ लाख २५ हजारांची फसवणूक केली. काही दिवसांनी सचिनने बँकखात्यातून पैसे कमी झाल्याचा मेसेज वाचल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. प्राथमिक चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कोथरूड पोलीस करत आहेत.