पुण्यातील 47 नागरिकांच्या कार्डचं पेट्रोल पंपावर झालं क्लोनिंग, मुख्य आरोपीला दिल्लीतून अटक

पुणे,पोलीसनामा ऑनलाइन – लष्कर परिसरातील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकल्यानंतर कार्डद्वारे पैसे देणार्‍यांचे कार्ड क्लोनिंगकरून त्याद्वारे फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातील मुख्य आरोपीला दिल्लीतून सायबर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी पुण्यातील 47 नागरिकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यापुर्वी त्याच्या साथीदारांना पकडले होते.

गुड्डू उर्फ जितेंद्र कुमार अवधेश सिंग (रा. बिहार) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलीसांनी यापूर्वी मिथून जमशेद अली, नोयल सादीक शेख, सइमुद्दीन अली आणि जुल्फीकार दुलाल अहमद (रा. वडगाव शेरी, मूळ-मालडा, पश्चिम बंगाल) यांना पकडले होते.

शहरात कार्ड क्लोनिंगकरून त्याद्वारे त्यांच्या खात्यावरून पैसे काढण्यात येत असल्याच्या घटना घडल्या होत्या. त्याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रारी येत होत्या. पोलिसांनी या तक्रारींची दखल घेऊन त्याचा तपास सुरू केला होता.

यावेळी लष्कर परिसरातील इस्टस्ट्रीट रोडवरील पेट्रोल पंपावर कार्डद्वारे पेट्रोल भरलेल्या नागरिकांचे कार्ड क्लोनिंगद्वारे पैसे काढल्याचे आढळून आले. त्यानुसार पाळत ठेऊन सायबर सेलचे निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या पथकाने पेट्रोल पंपावर काम करणार्‍या चार जणांस अटक केली होती.

या आरोपींकडून सात मोबाईल, 20 बनावट डेबीट कार्ड, 10 बँकेची डेबीट कार्ड, ओळखपत्र, आधारकार्ड रोख 1230 रूपये असा मुद्देमाल जप्त केला होता. यापूर्वी अटक केलेले आरोपी हे कार्ड क्लोन केलेली माहिती व पासवर्ड हे सिंग याला पाठवत होते. त्यानुसार त्याचा शोध घेतला जात होता. त्याचा दिल्लीला शोध घेतला जात होता. पण, तो सापडला नव्हता.

सायबर पोलिस ठाण्याचे पथकाला तो दिल्लीत असल्याची माहिती मिळाली होती. दिल्लीत गेल्यानंतर त्याचे मोबाईल लोकेशन घेतले. त्यावेळी तो दिल्लीला जात असल्याचे दिसून आले. चार तासांच्या प्रयत्नानंतर सिंह याला पकडण्यात आले. त्याच्याकडे दुसरा पाहिजे असलेला आरोपी रोहित सिंग याची चौकशी केली. त्यावेळी हरयाणा या ठिकाणी राहत असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी जाऊन चौकशी केल्यानंतर तो बाहेर गेला असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला अटक करता आलेली नाही.
पुण्यातील 47 नागरिकांची आतापर्यंत फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. आरोपींनी इतर राज्यात देखील अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याचे सांगण्यात आले.