सायबर भामट्यांनी 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 84 हजार उकळले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात सायबर फसवणूक सत्र कायम असून, दोन घटनांमध्ये सायबर चोरट्यांनी दोघांना 84 हजार रुपयांना गंडा घातला आहे. पोलीस वारंवार सतर्क राहण्याचे आणि ऑनलाइन खरेदी किंवा अनोळखी व्यक्तिंशी माहिती शेअर न करण्याचे आवाहन करत असताना नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.

ऑनलाईन छोटा भीम खरेदी केल्यानंतर तो कधी मिळणार यासाठी संपर्क साधल्यानंतर सायबर चोरट्यांनी 45 हजार रुपयांची फसवणूक केली.

याप्रकरणी विजय डांगे (वय ४६, रा. एरंडवणे ) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत. त्यांनी मुलासाठी हैद्राबाद येथून छोटा भीम खेळण्याची ऑनलाईन खरेदी केली होती. त्यानंतर छोटा भीम खेळणे कधी मिळणार, यासाठी त्यांनी संबंधित ब्ल्यू हर्ट वेबसाईटवरील क्रमांकावर फोन केला. त्यावेळी सायबर चोरट्याने विजय यांचा विश्वास संपादित करुन गोपनीयरित्या बँकखात्याची माहिती घेतली. त्यानंतर सायबर चोरट्याने बँकेतून ऑनलाईनरित्या ४४ हजार ३२१ रुपये काढून घेत फसवणूक केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजू चव्हाण करीत आहेत.

तर दुसऱ्या घटनेत ओलक्सवरून टीव्ही विकणे एकाला महागात पडले आहे. याबाबत रचित गुप्ता (वय 36) यांनी चतुःश्रुगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुप्ता हे बाणेर परिसरात राहण्यास आहेत. त्यांना घरचा जुना टीव्ही विक्री करायचा होता. त्यांनी ही माहिती ओएलक्सवर टाकली. त्यावेळी एका व्यक्तीने त्यांना संपर्क साधला. तसेच त्यांना टीव्ही खरेदी करायचा आहे, असे सांगून त्यांचे बँकेची माहिती घेतली. त्यानंतर व्हाट्सअपवर एक क्युआर कोड स्कॅन करण्यास सांगितला. तो कोड स्कॅन केल्यानंतर खात्यातून 39 हजार रुपये ट्रान्सफर केल्याचे दिसून आले. त्यावेकी त्यांना फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. अधिक तपास चतुःश्रुगी पोलीस करत आहेत.