कमी किंमतीत जुन्या वस्तू खरेदी करणं पडलं महागात, सायबर भामटयांकडून 57 हजाराचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  कमी किंमतीत जुन्या वस्तू खरेदी करणे चांगलेच महागात पडले असून, एकाला सायबर चोरट्यांनी 57 हजारांना गंडा घातला आहे. त्यांना जुने फर्निचर, सोफासेट, डबलबेड विक्री करण्याच्या बहाण्याने फसविले आहे.

याप्रकरणी ईश्वर डोके (वय २८, रा. वडगाव शेरी ) यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरत्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वर एका खासगी कपनीत नोकरीस आहेत. त्यांना जुने फर्निचर खरेदी करायचे होते. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन माहिती घेतली.

यावेळी सायबर चोरट्याने त्यांना फोन केला. कमी किंमतीत जुने फर्निचर, सोफासेट, डबलबेड विक्री करण्याची बतावणी केली. सायबर चोरट्याने ईश्वर यांचा विश्वास संपादित करण्यासाठी फर्निचरची बनावट कागदपत्रे पाठवून दिली. त्यामुळे फर्निचरच्या बुकिंगसाठी ईश्वर यांनी संबंधिताच्या बँकखात्यात ५७ हजार रुपये ऑनलाईन जमा केले. रक्कम जमा करुनही संपर्क होत नसल्याने फसवणूक झाल्याचे ईश्वरच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. प्राथमिक तपास केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सायबर पोलीस करत आहेत.