Pune : सायबर फसवणूकीच्या शहरात 2 घटना, दोन महिलांना घातला 6 लाखांना गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहरात सायबर चोरट्यांकडून होणाऱ्या ऑनलाइन फसवणुकीचे सत्र कायम असून दोन महिलांना 6 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येरवडा आणि चंदननगर परिसरात या घटना घडल्या आहेत.

याप्रकरणी 47 वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईलधारक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 8 ते 10 ऑगस्ट 2020 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर अज्ञाताने काहीदिवसांपूर्वी संपर्क साधला. परदेशात एका बड्या कंपनीत मनुष्यबळ विकास अधिकारी म्हणून नोकरीची संधी असल्याचे सांगितले. तसेच बोलण्यातून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेला परदेशातील नोकरीसाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल, असे सांगून महिलेला बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. महिलेने दिलेल्या बँक खात्यात पैसे भरले. महिलेने वेळोवेळी बँक खात्यात ५ लाख ११ हजार रुपये जमा केले. त्यानंतर महिलेने अज्ञाताच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे निदर्शनास आले.

फसवणूक झाल्याचे उघड झाल्यानंतर महिलेने नुकतीच येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक अजय वाघमारे करत आहेत.

तर दुसऱ्या घटनेत विमाननगर भागातील एका महिलेकडे सीमकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने बँक खात्यातून १ लाख ३० हजार रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केली आहे. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिलेस पंधरा दिवसांपूर्वी अज्ञाताने महिलेच्या मोबाइल फोन केला. मोबाइल कंपनीतून बोलत असून सीमकार्ड अपडेट करण्याचे काम सुरू आहे. सीमकार्ड अपडेट न केल्यास मोबाइल बंद पडेल, अशी भिती दाखवली. तसेच महिलेचा मोबाइल क्रमांक बँक खात्याला जोडलेला असल्याने चोरट्याने महिलेला एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर महिलेच्या बँक खात्यातून चोरट्याने १ लाख ३० हजार १३७ रुपये लांबविले.