pune : सायबर भामटयांनी तरूणास 1 लाखाला गंडवले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  केवायसी अपडेट करण्यासाठी प्ले स्टोअरवरून क्विक सपोर्ट अप्लिकेशन डाऊनलोड करण्यास भाग पाडून 1 लाख रुपये ट्रान्सफर केल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून दररोज नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारे फसविले जात आहे.

याप्रकरणी 37 वर्षीय व्यक्तीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइल धारकविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे खासगी नोकरी करतात. दरम्यान त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्याने मी पेटीएम कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तसेच तुमचे पेटीएम बंद पडणार आहे, त्यामुळे केवायसी अपडेट करा असे सांगितले. त्यांना प्ले स्टोअरवरून क्विक सपोर्ट हे ऍप्लिकेशन घेण्यास लावले. त्यांनी हे अप्लिकेशन घेतल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून 1 लाख 3 हजार रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केली आहे. हा सर्व प्रकार मार्च महिन्यात घडला आहे. त्यांनी याबाबत तक्रार दिली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक बिडवाई हे करत आहेत.