निवृत्त एअर मार्शल अधिकाऱ्यास सायबर चोरट्यांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मित्राच्या ईमेल आयडीसारखाच दुसरा ई मेल आयडी तयारकरून निवृत्त एअर मार्शलची फसवणूक करण्यात आली आहे. नऊ ते १७ नोव्हेंबर २०१९ दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी निवृत्त एअर मार्शल सुनिल श्रीपाद सोमन (वय ६३, रा. ६४, रा. एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमन हे वायु दलातून एअर मार्शल म्हणून सेवानिवृत झाले आहेत. त्यांना नोव्हेंबर २०१९ मध्ये अजित आपटे नावाच्या मित्राच्या ईमेल आयडीवरून एक मेल आला. तुर्कीला आलो असून 1 लाख रूपयांची तातडीने गरज असल्याचे म्हटले होते. त्यानंतर सोमन यांनी बँकेचा खातेक्रमांक मागून घेतला. त्यांना ईमेलमध्ये बँकेच्या खातेक्रमांक दिला. त्याच्यावर तक्रारदार यांनी एक लाख रूपये पाठविले.

त्यानंतर मित्राच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी मित्राला त्यांनी तुर्कीची ट्रीप कशी झाली, याबाबत विचारणा केली. त्यावेळी मित्र आपटे यांनी तुर्कीला गेलो नसल्याचे सांगितले. तुझी कोणी तरी फसवणूक केली असल्याचे सांगितले. तसेच, मित्राने त्याचा ईमेल आयडी हॅक झाला होता. पण, त्यांचा ईमेल आयडी नसल्यामुळे त्यांना कळविता आले नाही, असे सांगितले. फिर्यादीनी ईमेल पाहिला असता मित्राच्या ईमेल आयडीसारखाच तो ईमेल असल्याचे आढळून आले. अधिक तपास पोलिस निरीक्षक महादेव कुंभार हे करत आहेत.