Pune : दगडूशेठ गणपती ट्रस्टने ससूनमधील भोजनाचा प्रश्न सोडविला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या वतीने २०१३ सालपासून ससून रुग्णालयातील सर्व रुग्णांना दोन वेळचे भोजन विनामूल्य दिले जाते. ससून रुग्णालयात ट्रस्टच्या वतीने अत्याधुनिक पद्धतीचे स्वयंपाकघर बांधून देण्यात आले आहे. स्वच्छता, टापटीप, चांगल्या दर्जाची भोजनसेवा हे येथील वैषिष्ट्य आहे. कोरोना संकटकाळात ससूनमध्ये रुग्णांची संख्या वाढली तरीही सर्व रुग्णांच्या भोजनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी ट्रस्टने स्वीकारली. याखेरीज येथील डॉक्टरांच्या भोजनाची व्यवस्थाही ट्रस्टने केली. दर्जा उत्कृष्ट असल्याने डॉक्टरांनीही ही सेवा आनंदाने स्वीकारली. मध्यंतरी रुग्णसंख्या खूपच वाढल्याने बाहेरगावाहून डॉक्टर्स बोलावण्यात आले होते. निधी अभावी बाहेरगांवहून आलेल्या डॉक्टर्सच्या भोजनाची व्यवस्था करणे ससूनला शक्य होत नव्हते, तेव्हा दगडूशेठ ट्रस्टने हा प्रश्न सोडविला.

रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी असलेल्या विभागात डॉक्टर्स, नर्सेस आणि अन्य स्टाफ मिळून तीनशे जणांच्या भोजनाची व्यवस्था ट्रस्टने केली आहे. कोरोनाचे पाचशे रुग्ण दाखल होते त्या ही वेळी ट्रस्टने सर्व रुग्णांच्या प्रोटीनयुक्त आहाराची व्यवस्था केली. सुदैवाने सध्या कोरोना रुग्णांची संख्या शंभरपर्यंत घटली असून अजूनही भोजनासाठीची व्यवस्था ट्रस्टमार्फतच केली जात आहे. या उपक्रमासाठी ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे आणि अन्य पदाधिकारी यांचे सहकार्य वेळोवेळी मिळाले अशी माहिती ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अजय तावरे यांनी दिली.

याखेरीज ससूनमधील अन्य रुग्णांची दोन वेळची भोजनसेवा नेहमीप्रमाणेच ट्रस्टमार्फत चालू आहेच. ट्रस्टच्या या कामामुळे शासनावरचा फार मोठा भार हलका झाला आहे.