भाईगिरी करुन व्यापाऱ्याकडून खंडणी घेणारे गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भाईगिरी करुन व्यापाऱ्याकडून जबरदस्तीने खंडणी उकळणाऱ्या चार गुन्हेगारांच्या दत्तवाडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हा प्रकार २६ डिसेंबर रोजी जनता वसाहतमध्ये रात्री साडे आठच्या सुमरास घडला होता. पोलीस आयुक्तांनी सुरु केलेल्या कम्युनिटी पोलिसींगच्या माध्यमातून दत्तवाडी पोलिसांनी नागरिकांच्या बैठकीमुळे हा प्रकार उघडकीस आला.
अमित थोपटे, निलेश निवंगुणे उर्फ अप्पर दाद्या, गणेश निवंगुणे, सुरज माने (सर्व रा. जनता वसाहत, पुणे) यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करुन अटक केली. याप्रकरणी जनता वसाहतमध्ये राहणाऱ्या सुरेश चौधरी यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सुरेश चौधरी यांचे जनता वसाहत येथे किराणा मालाचे दुकान आहे. २६ डिसेंबर रोजी अमित थोपटे व सुरेश चौधरी यांनी दुकान येऊन मित्रांच्या खर्चासाठी हप्ता म्हणून ५ हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी सुरेश चौधरी याने पैसे नसल्याचे सांगितले. रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी चौधरी यांच्या दुकानात पुन्हा आले. त्यावेळी अमित थोपटे याने हातातील कोयत्याने चौधरी यांना पत्नी व मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली तर इतरांनी त्यांना मारहाण करुन पैशांची मागणी केली. घाबरलेल्या चौधरी ३ हजार ७०० रुपये दिले. उर्वरीत १ हजार ३०० रुपयांची मागणी करुन  पैसे दिले नाहीत तर मुलाला मारुन टाकण्याची धमकी दिली.
दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी आयोजीत केलेल्या नागरिकांच्या बैठकीत सुरेश चौधरी यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची माहिती दिली. वरिष्ठांनी घटनेचे गांभीर्य़ ओळखून आरोपीना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करुन अटक केली. तसेच अशा प्रकारे गुन्हेगारांकडून त्रास होत असल्यास त्यांनी पोलिसांकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले.
ही कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कृष्णा इंदलकर, पोलीस उप निरीक्षक अनिल डफळ, कुलदिप संकपाळ, पोलीस हवालदार तानाजी निकम, पोलीस नाईक सोमेश्वर यादव, पोलीस कॉन्स्टेबल शरद राऊत, शिवाजी शिरसागर, विकास कदम, अमित सुर्वे यांनी केली.