खडकी रावणगाव येथे बनावट ताडी अड्ड्यावर पोलिसांची धाड

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन टीम – दौंड तालुक्यातील खडकी रावणगाव येथे अवैध ताडी विक्री करणाऱ्या अड्ड्यावर बारामती क्राईम ब्रँचने अचानक धाड टाकून बनावट ताडी आणि ती बनविणाऱ्यास मुद्देमालासह अटक केली आहे.

बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक यांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी बारामती क्राईम ब्रँचचे प्रमुख पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने दौंड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या खडकी रावणगाव येथे बारामती क्राईम ब्रँच आणि दौंड पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अचानक छापा टाकला असता या ठिकाणी दुर्गेश श्रीशैल भंडारी राहणार- खडकी, तालुका- दौंड, जिल्हा- पुणे हा इसम क्लोरल हायड्रेट, सक्रीन आणि रंग येण्यासाठीची पावडर याचा वापर करून बनावट ताडी तयार करून ती खरी ताडी असल्याचे भासवून विक्री करत असताना मिळून आला. यावेळी त्याचे ताब्यातून 2,930 रुपये रोख, 40 लिटर बनावट ताडी, क्लोरल हायड्रेट, सक्रीन आणि रंग येण्यासाठीची वापरण्यात येणारी पावडर असा 5,895 रुपये चा मुद्देमाल जप्त करून सदर इसमावर दौड पोलीस ठाण्यात फसवणुक व दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कामगिरी ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस, अधीक्षक बारामती विभाग जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, भिगवण चे पोलीस उपनिरीक्षक रियाझ शेख, बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, तसेच आरसीपी पथकातील 5 पुरुष 2 महिला जवान पोलिस जवान तसेच दौंड पोलीस स्टेशन चे पोलिस जवान के.बी शिंदे, संजय चांदणे, अरुण राऊत यांनी केली आहे.