रेल्वेत जागेवर बसण्याच्या वादातून आई, पत्नी आणि चिमुरडीच्या समोरच पित्याचा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रेल्वेमध्ये जागेवर बसण्याच्या वादातून एका युवकाला आपला जीव गमवावा लागला असल्याची भयानक घटना दौंड जवळ घडली आहे. मुंबई-लातूर-बिदर एक्स्प्रेस गाडीमध्ये जागेवर बसण्याच्या वादातून १२ जणांच्या टोळक्यानं केलेल्या बेदम मारहाणीमध्ये कल्याण येथे राहणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे युवकाला मारहाण करणाऱ्यांमध्ये सहा महिलांचा देखील समावेश असल्याचे समजत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी मुंबई-लातूर-बिदर एक्स्प्रेस पुण्यावरून सुटून दौंडच्या दिशेने जात असताना ही घटना घडली असून या घटनेबाबत रेल्वे पोलिसांनी माहिती देताना मयत सागर मारकड हा आपली पत्नी ज्योती, आई आणि त्याच्या दोन वर्षाच्या मुलीसह एक्स्प्रेसमधून प्रवास करत होता. साधारण दुपारी पावणे एकच्या सुमारास पुणे स्थानक सोडल्यानंतर एक्स्प्रेसमधील जनरल डब्यात प्रचंड गर्दी होती. बसायलाही जागा नव्हती. त्याचवेळी सागर यानं सीटवर बसलेल्या एका महिलेला थोडं सरकायला सांगितलं. त्यानंतर त्या महिलेनं शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सहा महिला आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर सहा पुरुषांनी सागरला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

सागरच्या कुटुंबीयांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी मारहाण सुरुच ठेवली. दौंडपर्यंत ते सागरला मारहाण करत होते. या मारहाणीत जखमी झालेल्या सागरला दौंड येथे एक्स्प्रेस पोहोचताच रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.