बाहेरच्यांना पोलीस वसाहतीत प्रवेश बंद..!

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता शहरातील पोलीस वसाहती प्रवेश बंद करण्यात आला आहे. वसाहतीतील व्यक्ती व्यतिरिक्त अन्य व्यक्तींना हा प्रवेश बंद असणार असून, नातेवाईक, मित्रमंडळी यांना देखील बंदी घालण्यात आली आहे. तसेच विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर रहिवाशांना फक्त एकाच प्रवेशव्दारातून आत सोडले जाणार आहे. पोलिस व त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कर्तव्यावर असताना काही पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. या घटना वाढत आहेत. बहुतांश कर्मचारी पोलिस वसाहतीत वास्तव्यास आहेत. त्यामुळे पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपायोजना तयार करून विशेष खबरदारी घेतली जाते आहे. पोलिस वसाहतीत प्रवेश करण्यासाठी असणारे सर्व मार्ग बंद करून एकच मार्ग सुरू ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव, गाडी क्रमांक, संपर्क क्रमांक, बाहेर जाण्याचे कारण याची नोंद ठेवली जाणार आहे. विनाकारण आत बाहेर करणाऱ्या व्यक्तींची माहिती सबंधीत पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना द्यावी लागणार आहे. आत प्रवेश करणाऱ्यांची तपासणी थर्मल थर्मामिटरद्वारे करून सॅनिटायझर टनेलमधून गेल्यानंतरच आत प्रवेश करून दिला जाणार आहे. तसेच पहाऱ्यावर असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना कर्तव्याच्यावेळी त्यांच्या मोबाईलचे लोकेशन चालू ठेवावे लागणार आहे. तसेच पोलिस वसाहतीत राहणाऱ्या व्यक्तींनी गर्दी करून गप्पा मारत बसणे, मुलांनी क्रिकेट खेळणे व अन्य इतर कारणासाठी गर्दी करण्यास मनाई घालण्यात आली आहे

शहरातील पोलिस वसाहतीत दररोज सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिस वसाहतीमध्ये कोणत्या व्यक्तीला सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचा त्रासनाचा आजार आहे, का याची माहिती लाईन दफेदार यांना दिवसभर घ्यावी लागेल. त्यानंतर दररोज ती माहिती रात्री नऊ पर्यंत त्यांना दिलेल्या व्हॉट्स अप क्रमांकावर पाठवावी लागणार आहे.

पोलिस मुख्यालयाचे उपायुक्त यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. तर पोलिस वसाहतीत पिकेटवरील (पहाऱा) कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.