Pune : मृत वीज कंत्राटी कामगाराला स्वखर्चाने 10 लाखांचा विमा सुरक्षा कवचाचा लाभ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  विज ऊद्योग हा अत्यावश्यक सेवा आहे . कोरोना काळात वीज कंत्राटी कामगारांनी सर्व प्रकारचे धोका पत्करून अखंडित सेवा बजावली. जनतेची अखंडीत सेवा नि:काम वृत्तीने केली आहे. या धोकादायक वीज उद्योगात काम करत जनतेला अखंडित व सुरळीत वीज सेवा देताना राज्यभरात मागील वर्षी तब्बल 40 विज कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला होता. अपघात झाल्यानंतर संबंधित कंत्राटदार व प्रशासन कोणतीच जबाबदारी घेत नाही, नुकसान भरपाई देण्यासाठी टाळा टाळ होते, त्या मुळे संबंधित कुटुंब उघड्यावर पडते. त्या वेळी शासनाकडून कोणतीच आर्थिक मदत या कामगारांना न दिल्याने कामगाराच्या कुटुंबाची आर्थिक हेळसांड झाली. दुर्दैवाने नेहमीच असेच घडते.

त्यामुळे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने (संलग्न भारतीय मजदूर संघ) पुढाकार घेऊन संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मा.अण्णाजी देसाई यांच्या संकल्पनेतून 1 जुलै 2020 रोजी वेलफेअर फंडांची स्थापना केली व ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी च्या सहकार्याने संघटनेच्या सदस्यांसाठी 10 लाख रुपयांची अपघात विमा योजना सुरू केली.

दिनांक 21 सप्टेंबर 2020 रोजी संगमनेर तालुक्यातील सोपान भाऊका कुलाळ यांचे घारगाव शाखेतील कर्जुले पठार येथील वीज उपकेंद्रात अपघाती निधन झाले होते. त्यांनी या विमा योजनेत सहभाग घेतला होता त्या मुळे त्या कामगारांची पत्नी श्रीमती प्रियंका कुलाळ यांना आज महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ वेल्फेअर फंडांच्या वतीने 10 लाखाचा अपघात विम्याचा चेक देण्यात आला. तसेच संघटना कामगाराच्या कुटुंबीयाना कायदेशीर हक्क, पेंशन करिता प्रयत्नशील आहे.

या प्रसंगी संघटनेचे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे (संलग्न भारतीय मजदूर संघ) सरचिटणीस सचिन मेंगाळे, संघटनमंत्री राहुल बोडके, शरद मते, रामदास खराडे, सागर अहिनवे उपस्थित होते. ओरिएंटल इन्शुरन्स च्या शाखा प्रमुख सुनीता भुरेवार व विजय अहिवळे यांचे तसेंच महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष नीलेश खरात , कोषाध्यक्ष सागर पवार, कार्याध्यक्ष उमेश आणेराव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.