पुण्यात 21 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला, अनैतिक संबंधातून खून झाल्याचा अंदाज

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – वीट भट्टीवर काम करणाऱ्या एका 21 वर्षीय महिलेचा पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे. तिचा अनैतिक संबंधातून खून झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुशीला किंडा (वय 21, रा. लोहगाव, मूळ. झारखंड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशीला ही मूळची झारखंड राज्यातील आहे. गेल्या काही वर्षांपासून ती लोहगाव परिसरात एका वीटभट्टीवर काम करत होती. तिचा पती आणि ती येथील भाड्याच्या खोलीत राहत होते. दरम्यान वीटभट्टी जवळच पाण्याचा हाउद (पाण्याची टाकी) आहे. दरम्यान दुपारी सुशीला यांचा मृतदेह आढळून आला. येथील नागरिकांनी ही माहिती विमानतळ पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तसेच सुशीला यांचा मृतदेह बाहेर काढून ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. दरम्यान खून करून मृतदेह पाण्यात टाकला असण्याची शक्यता आहे. अनैतिक संबंधातून खुनाची घटना घडली असण्याची शक्यता आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहेत.