Pune : सुवर्णसाज चढवलेली शमी-मंदार माळ दगडूशेठ गणपतीला अर्पण

पुणे – विजयादशमीच्या दिवशी दगडूशेठ गणपतीला सुवर्ण साज असलेली शमी-मंदार माळ विधीवत पूजन करुन अर्पण करण्यात आली. १०८ मण्यांची, २८५० पांढऱ्या खड्यांची कलाकुसर असलेल्या या माळेसाठी ८५ तोळ्यांचा सुवर्णसाज चढविण्यात आला आहे.

विजयादशमीला शमीचे पूजन केले जाते. महाभारतात पांडवांच्या अज्ञातवासाच्या काळात अर्जुनाने त्याची अस्त्रे शमीच्या बुंध्यात लपवून ठेवली होती. ती विजयादशमीला बाहेर काढली. त्यामुळे या दिवशी शमीला महत्त्व आहे. गाणपत्य सांप्रदायात शमी आणि मंदार ही दोन गणेशाची दृश्य रुपं मानली जातात. हे औचित्य साधण्यासाठी यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे गणपतीला शमी- मंदारची माळ वाहण्यात आली. श्री क्षेत्र मोरगांव येथील शमी आणि मंदारच्या झाडापासून तयार करण्यात आलेले मणी या माळेसाठी वापरले आहेत. पूजेच्या चांदीच्या लहान मूर्तीलाही माळ वाहण्यात आली आहे. माळेसाठी २८५० पांढऱ्या खड्यांची कलाकुसर करण्यात आली. राजू वाडेकर यांनी सलग १५ दिवस अहोरात्र काम करून मणी घडवले आणि माळेला सुवर्णसाज पीएनजी ज्वेलर्सच्या कारागिरांनी चढविला.

मंदिरात गणपतीला विधीवत माळ अर्पण करण्यात आली त्याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे, उपाध्यक्ष सुनीलजी रासने, कोषाध्यक्ष महेशराव सूर्यवंशी, सरचिटणीस माणिकदादा चव्हाण, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.

ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, गाणपत्य संप्रदायात शमी व मंदार वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. और्व मुनींच्या कन्या शमी आणि धौम्य ॠषींचा पुत्र मंदार यांना पंचेशगुरु भगवान भृशुंडीच्या महर्षींच्या शापामुळे वृक्षत्व प्राप्त झाले. त्यातून त्यांच्या सुटका व्हावी, याकरीता दोघांच्या पिताश्रींनी केलेल्या तपश्चर्येनंतर भगवान म्हणाले, शाप नष्ट होणार नाही, मात्र मी दोन्ही वृक्षांच्या मुळाशी निवास करीन. मंदाराच्या मुळाची मूर्ती तयार करुन जो माझी उपासना करेल, त्याला मी सर्वकाही प्रदान करीन. क्वचित प्रसंगी दुर्वा उपलब्ध नसल्यास शमीच्या पत्रांनीही माझी पूजा संपन्न होईल. भक्तांच्या विघ्नांचे शमन करण्याची क्षमता शमीला प्राप्त असेल. उपासकाची विघ्ने दूर होतील, असे सांगत मोरया या दोन्ही वृक्षांच्या मुळाशी अंतर्धान पावले. त्यामुळे ट्रस्टतर्फे भक्तांच्या देणगीतून आलेल्या सोन्याचा साज असलेली ही शमी-मंदार माळ साकारण्यात आली आहे.