पुणे पालिकेत पहिल्यांदाच महिलेची विरोधी पक्षनेते पदावर निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी ज्येष्ठ नगरसेविका दीपाली बाबा धुमाळ यांची निवड करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा मान नगरसेविका दीपाली धुमाळ यांना मिळाला आहे. विरोधी पक्षनेते पदावर महिला नगरसेविकेची निवड होण्याची महापालिकेतील पहिलीच वेळ आहे. पुढील एक वर्षभरासाठी त्यांची ही निवड करण्यात आली आहे.

या पदासाठी माजी महापौर वैशाली बनकर, नगरसेविका नंदा लोणकर, अश्विनी कदम, नगरसेवक योगेश ससाणे, महेंद्र पठारे, सचिन दोडके हे इच्छुक होते. चर्चेत असलेली नावे मागे पडून त्यामधून दिपाली धुमाळ यांचे नाव जाहीर करण्यात आले. निवड झाल्यानंतर दीपाली धुमाळ म्हणाल्या, पक्षाने माझी निवड केल्याने आभारी आहे. आगामी काळात शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार आहे.

विधानसभा निवडणुकीपासून विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांच्याजागी नव्या नेत्याच्या निवडीची चर्चा सुरु होती. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पुण्याचे पालकमंत्रीपद त्यांच्याकडे आले. यानंतर पहिल्याच बैठकीमध्ये बराटे यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले. बराटे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची निवड होणार याची चर्चा मागील पंधरा दिवसांपासून सुरु होती. तसेच इच्छूकांनी देखील मोर्चे बांधणी सुरु केले होती. मात्र, आज दीपाली धुमाळ यांचे नाव अंतीम करून त्यांचे नाव जाहीर करण्यात आले. दीपाली धुमाळ यांची नगरसेवक म्हणून दुसरी टर्म आहे.