Pune : धमक्या देऊन खंडणी उकळणे व सराफ व्यवसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दीप्ती काळे व तिच्या टोळीवर ‘मोक्का’नुसार कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – धमक्या देऊन खंडणी उकळणे व सराफ व्यवसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्ह्यात दीप्ती सरोज काळे व तिच्या टोळीवर मोक्कानुसार कारवाई केली आहे. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे. तर आयुक्तांचा हा 28 वा मोक्का आहे.

दीप्ती सरोज काळे व निलेश उमेश शेलार (रा. कोथरुड) यांना अटक केली आहे. तर टोळीतील इतर फरार आहेत.

दीप्ती काळे टोळी प्रमुख असून, गेल्या दहा वर्षापासून या टोळीने कट रचून खंडणी उकळणे, खुनाचा प्रयत्न, आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे, बनावट व्हिडीओ तयार करून ते व्हायरल करण्याचे गुन्हे केले आहेत. गेली 10 वर्ष त्यांनी गुन्हे केले असून, आर्थिक फायदा घेतला आहे.

नुकतीच दीप्ती काळे व इतरांवर सराफ व्यवसायिकास आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे आणि एका बांधकाम व्यवसायिकास बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन जमीन जबरदस्तीने मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर विश्रामबाग पोलिसांनी पूर्वीचे रेकॉर्ड व आत्ताच्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर टोळीवर मोक्काची कारवाई करावी, असा प्रस्ताव परिमंडळ एकच्या उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्याकडे पाठवला होता. त्यांनी त्याची छाननी करून तो प्रस्ताव कारवाई करण्यासाठी अप्पर आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे पाठवला. त्यानुसार या प्रस्तवावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्काची कारवाई केली आहे.